वणी टाईम्स न्यूज : वणी परिसरात गोवंश जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत सलग चार वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण १७ गोवंश जनावरे तसेच नऊ वाहने जप्त करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई २८ एप्रिल रोजी मोहर्ली गावाजवळ करण्यात आली. फिर्यादी दिनेश रमेश सालवटकर यांच्या तक्रारीवरून तीन पिकअप वाहनांमधून सात गोवंश जनावरे क्रूरपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तीन वाहने व सात जनावरे असा सुमारे ६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी युवराज तुराणकर, सुनिल आसुटकर व अभय उईके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी कारवाई ३ मे रोजी वणी रोड रेल्वे क्रॉसिंग परिसरात करण्यात आली. फिर्यादी सुमित निलावार यांच्या तक्रारीनुसार टाटा इन्ट्रा वाहनातून एक बैल व दोन गोऱ्हे यांना आखूड दोरीने बांधून, चारा-पाण्याविना वाहतूक केली जात होती. पोलिसांनी सुमारे १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जिब्राण शेख अखिल व पुणाजी मेश्राम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या प्रकरणात ५ मे रोजी पहाटे ड्रीम लॅन्ड सिटी, मुर्धानी रोड परिसरात दोन बैलांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. धनराज मडावी यांच्या फिर्यादीवरून राजू गुप्ता, अनिल खैरे व शेख रिजवान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत दोन बैल व एक टाटा इन्ट्रा वाहन असा सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौथी मोठी कारवाई ५ मे रोजी सकाळी संविधान चौक, वरोरा रोड येथे करण्यात आली. फिर्यादी विशाल दुधबळे यांच्या तक्रारीवरून चार वेगवेगळ्या वाहनांतून आठ गोवंश जनावरे निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी चार वाहने व आठ जनावरे असा सुमारे ६ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी प्रथमेश बोरतवार, रामदास रागीट, शंकर झाडे, शरद चटकी, नंदकिशोर डोळस, लक्ष्मण घागी, गणेश दातारकर व अमीत कसारे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सर्व प्रकरणांत आरोपी जनावरांना आखूड दोरीने बांधून वाहनात कोंबत होते. जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती तसेच वाहतूक व जनावरांची आवश्यक कागदपत्रेही आरोपींकडे आढळून आली नाहीत. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.










