वणी टाईम्स न्युज : पोलीस ठाण्याच्या गेटचे अगदी समोर तहसील कार्यालय बाहेर ठेवलेली दुचाकी भरदिवसा चोरट्यांनी लंपास केली. तहसील कार्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत धनंजय अशोक देशपांडे, (24) रा. तैलीफेल वणी यांनी दुचाकी चोरीबाबत तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. मागील काही काळापासून दुचाकी चोरीच्या घटनेत सतत वाढ झाली असून पोलीस स्टेशनच्या 50 पाऊल समोर ठेवलेली मोटरसायकल लंपास करण्यापर्यंतची मजल चोरट्याने मारली आहे.
फिर्यादी धनंजय देशपांडे हा तहसील कार्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करते. दिनांक 27 जानेवारी रोजी त्यांनी आपली बजाज पल्सर मोटारसायकल क्रमांक MH29 AZ1349 नेहमी प्रमाणे तहसील कार्यालय समोर उभी करुन रेकॉर्ड रुम मध्ये गेले. सायंकाळी 5.30 वाजता घरी जाण्याकरिता निघाले असता पल्सर मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी दिसून पडली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता मोटरसायकल कुठंही मिळून आली नाही.अखेर फिर्यादी यांनी वणी पोलीस ठाण्यात त्यांची जुनी वापरती बजाज पल्सर मोटरसायकल किंमत 20 हजार कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दिली.
शहरात 100 सीसीटिव्ही, तरी चोरटे मोकळे
गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने काही महिन्यांपूर्वी लाखों रुपये खर्च करून शहरात ठिकठिकाणी 100 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले. हाई डेफिनेशन क्वालिटीच्या या कॅमेऱ्यांमध्ये रस्त्यावरील चालत्या माणसाचे डोक्यावरील केस मोजता येते. मात्र पोलिसांना दुचाकी चोरटे का दिसत नाही ? हा न सुटणारा कोडंच आहे.