वणी टाईम्स | यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत शिरपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गावठी बनावटीचे देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून पोलिसांनी तब्बल 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, शाहरुख गुलशेर खान (वय 31 वर्षे) हा तरुण मुंगोली खदान परिसरात चोरीच्या उद्देशाने गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. या माहितीच्या आधारे 13 जून रोजी रात्री सुमारे 9.45 वाजताच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून मुंगोली ते वर्धा नदी पुलाजवळील परिसरात छापा टाकला.
कारवाईदरम्यान संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी देशी पिस्तूल (कट्टा) आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाची किंमत सुमारे 50 हजार रुपये तर काडतुसांची किंमत 2 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमाच्या कलम 3/25 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 135 आणि 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
अवैध शस्त्रास्त्रांचा वापर करून गुन्हेगारी कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या संशयिताला वेळीच जेरबंद करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून शिरपूर पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.










