वणी टाईम्स न्युज : बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्येचा मुद्दा संपूर्ण राज्यात गाजत असताना शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष यांनी पोलीस पाटील यांच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणं हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल झरीजामणी तालुक्यात 3 मार्च रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेतील हल्लेखोर मोरेश्वर परशराम सरोदे, रा. खडकडोह, ता.झरीजामणी विरुद्ध मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हल्यात गंभीर जखमी चिचघाट येथील पोलीस पाटील पंढरी अरुण डुकरे (35) याला उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
फिर्यादी अविनाश अशोक डुकरे रा. चिचघाट यांनी दिलेल्या फिर्यादनुसार त्यांचा चुलत भाऊ पंढरी डुकरे हा पोलीस पाटील आहे. 3 मार्च रोजी शेतातील माणसाचा डब्बा घेऊन जात असताना खडकडोह बस थांब्याजवळ आरोपी मोरेश्वर सरोदे यांनी त्याला थांबवून अश्लील शिवीगाळ केली. मात्र पंढरी यांनी त्याकडे लक्ष न देता तिथून निघून गेला. सायंकाळी 7.30 वाजता पंढरी डुकरे हा शेतातील माणसाला खडकडोह येथे सोडायला दुचाकीवर आला असता आरोपी मोरेश्वर यांनी त्यांच्या दुचाकीतून शॉकपची रॉड काढून पंढरी याच्या डोक्यावर वार केला.
आरोपी यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने दुसरा वार केला असता पंढरी यांनी वार चुकवला. त्यामुळे लोखंडी रॉडचा वार त्याच्या मानेवर बसला. पंढरी डुकरे यांनी आरडाओरडा केला असता आरोपीने तिथून पळ काढला. डोक्यावर रॉडचा वार बसल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तप्रवाह सुरु झाला. त्यामुळे फिर्यादी यांनी आपल्या चुलत भाऊ पंढरी डुकरे याला चारचाकी वाहनात टाकून मुकुटबन पोलीस ठाण्यात आणले. डोक्यातून रक्त निघत असल्याने पोलिसाने त्याला उपचारासाठी तुरंत वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोरेश्वर सरोदे विरुद्ध कलम 351 (2), 296 आणि 118 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर करीत आहे.