वणी टाईम्स न्यूज : खाजगी प्रवासी वाहन चालकाचा अपहरण करून त्याच्या पोटाला चाकू लावून मारहाण करीत 20 हजार 900 रुपये बळजबरीने हिसकावून घेण्याची घटना 7 जून रोजी करंजी मारेगाव मार्गावर खेकडवाई फाट्याजवळ घडली होती. लूटमारच्या सदर घटनेची तक्रार फिर्यादी वाहन चालक सलीम सुलतान गिलाणी रा. करंजी यांनी मारेगाव पोलिस ठाण्यात नोंदविली होती. तक्रारीवरुन मारेगाव पोलिसांनी आरोपी नरेश जैस्वाल, रा. यवतमाळ व त्याचे इतर 4 साथीदाराविरुद्द अपहरण व दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.
दरोड्याच्या घटनेतील सहभागी आरोपीच्या शोधात असताना एलसीबी पथकाला 3 आरोपी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून पोलिस उप निरक्षक रामेश्वर कांडूरे यांचे नेतृत्वात एलसीबी पथकाने नागपुर गाठून रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. माहितीप्रमाणे तिन्ही आरोपी रेल्वे स्थानकावर पोहचले असता पोलिस पथकाने शिताफीने तिघांना ताब्यात घेतले. दरोड्याच्या घटनेत वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी बाबत आरोपीनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी MH 14-DA 2727 क्रमांकाची स्कॉर्पिओ वाहनही जप्त केले.
सदर कार्यवाही डॉ. पवन बनसोड जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, आधार सिंग सोनोने पो. नि. एलसीबी यांचे मार्गदर्शनात एपीआय अमोल मुडे, पीएसआय रामेश्वर कांडुरे, पोलीस अमलदार उल्हास कुरकुटे, नरेश राऊत, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सतीश फुके यांनी पार पाडली.