वणी टाईम्स न्युज : स्थानिक गुन्हा शाखा (LCB) व पाटण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तेलंगणा राज्यात गोवंश तस्करीचा डाव उधळला. पोलिसांनी 4 मालवाहू पिकअप वाहनात निर्दयीपणे कोंबून भरलेले 15 गोवंश जनावरांची सुटका केली. झरी पाटण मार्गावर बिरसाईपेठ जवळ 13 मे रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
सदर प्रकरणी पोलिसांनी 8 गोवंश तस्करांना अटक केली आहे. पोलिसांनी 15 गोवंश जनावर व 4 मालवाहू चारचाकी वाहन असे एकूण 11 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.गोपनीय माहितीच्या आधारावर करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी बोलेरो मॅक्स मेटाडोर क्रमांक MH29 -T6103 , MH29 -BE8163, MH 31- CQ 2887 व MH 29 -BE 3297 ही 4 वाहने जप्त केली.
फिर्यादी उल्हास सुभाषराव कुरकुटे, पो.हे.कॉ. यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलिसात आरोपी जनावर तस्कर गजानन धनराज जाधव, रा.मंदर, अमोल केशव भटारकर रा. कुंभारखणी, कार्तिक भाऊराव पवार रा. जवाहर नगर, गुलाब गणपत चिंचोलकर रा. बोपापूर, विलास झित्रूजी आसुटकर रा. बाळापुर, संदीप सुधाकर महल्ले रा. आंजी, तालुका घाटंजी, रविकिरण गोसावी महादुले रा.साखरा व नागेश देवराव खापणे रा. मंदर यांचेवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम 11 (1)(j), 11 (1)(d), 11 (1)(g), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 व कलम 281 भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही स्थानिक गुन्हा शाखाचे पीएसआय धनराज हाके, हेडकॉन्स्टेबल उल्हास कुरकुटे, पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, पो.ना. निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, नरेश राऊत तसेच पाटण पोलिस ठाण्यातील पो.हवा.अमित पोयाम, सुरेश राठोड, हेमंत कामतवार यांनी केली.