वणी टाईम्स न्युज : लग्न होऊन अवघे 2 महिने होत नाही तर सासरकडील लोकांनी 2 लाख रुपये हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करत असल्याची तक्रार पीडित महिलेने मुकुटबन पोलीस ठाण्यात नोंदवली. महिला समुपदेशन केंद्रात दोन्ही पक्षात तडजोड न झाल्याने अखेर मुकुटबन पोलिसांनी फिर्यादी विवाहितेच्या पती, सासू, सासरे व नणदी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राकेश श्रीहरी बुरडकर (30), श्रीहरी उद्धव बुरडकर (65), अनिता श्रीहरी बुरडकर (58) व कु. करिष्मा श्रीहरी बुरडकर (24) सर्व रा. महाराणा प्रताप वॉर्ड, दत्त मंदिर जवळ बल्लारपूर असे गुन्हा दाखल झालेले व्यक्तीची नावे आहेत.
वणी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास तक्रारदार महिलेचा मे 2024 मध्ये राकेश श्रीहरी बुरडकर सोबत बाबुपेठ चंद्रपूर येथे हिंदू रितीरिवाज प्रमाणे विवाह झाला होता. लग्नाच्या वेळी वर पक्षाने केलेल्या मागणीनुसार वधूपित्याने 2 लाख नगदी तसेच सोन्याचे दागिने तसेच भेट वस्तू दिली. लग्नानंतर एक महिना नववधूला चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर तिचा पती दारु पिऊन घरी यायचा तसेच पत्नीलासुद्धा बळजबरीने दारू पिण्यास भाग पाडायचा. नकार दिल्यास तिच्यासोबत मारझोड करायचं.
एवढंच नव्हे तर पीडितेची सासू, सासरे व नणंद तिला मोलकरीण सारखी वागणूक देऊन शारीरिक व मानसिक त्रास द्यायचे. वडिलांकडून 2 लाख रुपये आणण्यासाठी सर्वजण मिळून तिचा छळ करीत होते. असे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. 7 जुलै 2024 रोजी पती, सासू सासरे यांनी पीडितेला बळजबरीने माहेरी पाठवून दिले. त्यानंतरही अनेकदा दुसऱ्याच्या फोनवरून 2 लाख रुपये आणण्याची मागणी सुरू ठेवली. शेवटी पीडित विवाहितेनी मुकुटबन पोलीस ठाण्यात तिचे पती, सासू, सासरे व नणंद विरुद्ध हुंडाविरोधी कायद्याअंतर्गत कारवाईची फिर्याद दिली. पोलिसांनी वरील सर्व आरोपी विरुद्ध कलम 3(5), 85 BNS अन्वये गुन्हा दाखल केला आहे.