वणी टाईम्स न्युज : क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद, भांडण, मारहाण व खून होत असल्याच्या अनेक घटना हल्ली समोर येत आहे. प्रत्येकाची सहनशक्ती कमी होत चालली आहे. अशाच एक घटनेत घरासमोर रस्त्यावर बैलबंडी उभी करण्यावरून शेजारी दोन कुटुंबात झालेला वाद विकोपाला जाऊन मारहाणीवर पोहचले. शहरालगत गणेशपूर ग्राम पंचायत हद्दीत उमेदपार्क वसाहतीत शनिवार 15 मार्च रोजी रात्री 9.30 वाजता घडलेल्या ह्या घटनेबाबत दोन्ही कुटुंबाने एकमेकांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
फिर्यादी अविनाश नरेंद्र दोडके (48) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते पत्नीसह त्यांच्या कारमध्ये हॉस्पिटल जाण्यासाठी निघाले असता गैरअर्जदार अरुण शामराव खोकले (67) यांच्या घरासमोर रस्त्यावर त्यांची बैलबंडी उभी होती. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने गैरअर्जदार यांची कार उभी असल्याने कार काढताना बैलबंडीची समोरील बाजू त्यांच्या कारला लागली. त्यामुळे त्यांनी खोकले यांना तुम्ही नेहेमी बैलबंडी रस्त्यावर का उभी ठेवता अशी विचारणा केली. तेव्हा अरुण खोकले यांनी वाद घालून शिवीगाळ केली.
हॉस्पिटल मधून परत आल्यावर गैरअर्जदार अरुण खोकले, त्यांचे दोन मुलं तसेच भाऊ हे फिर्यादी अविनाश दोडके यांच्या घरी आले व तुम्ही वडिलांसोबत वाद का केला? असे सांगून थापड बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत त्यांच्या डाव्या बाजूच्या डोळ्याला इजा झाली असून डोळ्यात रक्त जमा झाले. अशी फिर्याद दिली. फिर्यादवरून पोलिसांनी गैर अर्जदार अरुण शामराव खोकले अधिक 3 जणांवर कलम 115 (2) व 352 BNS नुसार गुन्हा दाखल केला.
फिर्यादी आशा अरुण खोकले (54), रा. उमेदपार्क हिने तक्रार नोंदविली की, त्यांच्या शेतातील गडी हा बैलबंडी मध्ये चना घेऊन आला असता घरासमोर बैलबंडी उभी करून चना उतरवत होते. त्याचवेळी शेजारी अविनाश दोडके यांनी रस्त्यावर बैलबंडी उभी केल्यावरून वाद घालून व शिवीगाळ करुन निघून गेला. काही वेळानंतर अविनाश हा आपल्या मुलगा व त्याच्या मित्रासोबत पुन्हा घरासमोर येऊन फिर्यादीचे पती सोबत मारहाण केली. त्यामुळे त्यांचा डोक फुटला व रक्त निघत होत. मारहाण सुरू असताना भांडण सोडविण्यासाठी आलेले फिर्यादीचे दोन मुलं व दीर आले असता गैरअर्जदार यांनी त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अविनाश नरेंद्र दोडके व अधिक 2 विरुद्ध कलम 115(2), 118 (1), 3 (5), 351 (2) (3), 352 अन्वये गुन्हा दाखल केला.