वणी टाईम्स न्युज : दीपक चौपाटी परिसरात दोघांनी एका व्यक्तीच्या खिशातून बळजबरीने मोबाईल आणी पैसे हिसकावून पळून जाण्याची घटना सोमवार 23 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडली. लूटमारीच्या घटनेबाबत फिर्यादी नंदकिशोर प्रकाश जीवने (30), रा. कोरपना, जि. चंद्रपूर यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
फिर्यादी हा दीपक चौपाटी बार समोरून जात असताना 20 ते 25 वयोगटातील दोन तरुणांनी त्याचा पाठलाग करून अडविले. दोघांपैकी एकाने फिर्यादी याला पकडुन ठेवले तर दुसऱ्या आरोपीने पेंटच्या मागील खिशात असलेले 1800 रुपये काढून पळ काढला. पळून जाताना त्यांनी त्याच्या साथीदाराला भाग साहिल.. अशी हाक मारली. तेव्हा दुसऱ्या आरोपीने फिर्यादीच्या पेंटच्या खिशातील 15 हजार किमतीचा विवो मोबाईल बळजबरीने काढून, थांब मयूर… असे म्हणत पहिल्या आरोपीच्या मागे पळून गेला.
दिवसाढवळ्या घडलेल्या लूटमारीच्या या घटनेबाबत फिर्यादी यांनी वणी पोलीस ठाण्यात आरोपी साहिल व मयूर विरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 3(5), 309(4) BNS अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलीस विभागाचा वचक संपला ..?
मागील काही काळात शहरात गुन्हेगारीचे आलेख वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. चोरी, दरोडा, लूटमारीच्या घटना सतत घडत आहे. शहरात उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पुलिस स्टेशन व स्थानिक गुन्हा शाखाचे कार्यालय असताना गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती नसल्याची जाणीव नागरिकांना होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये पोलिसांचा वचक संपला की काय ? अशी खमंग चर्चा नागरिक करीत आहे.