वणी टाईम्स न्युज : सद्य 12 वी बोर्डाचे पेपर सुरू असून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी घरून निघालेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. ती परीक्षा केंद्रावरही पोहोचली नाही आणि परत घरीही आली नाही. त्यामुळे फिर्यादी वडिलांनी त्यांची अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील एका गावात आईवडील व भावासह वास्तव्यास सोनाली (बदललेले नाव) हिची 12वी ची परीक्षा सुरू आहे. 1 मार्च रोजी दुपारी 1 वाजता पेपर द्यायला जाते असे सांगून मुलगी घराबाहेर पडली. सायंकाळी 7 वाजे पर्यंत मुलगी घरी न आल्याने वडिलांनी मुलीच्या मैत्रिणीकडे जाऊन विचारणा केली. तिच्या मैत्रिणीने सांगितले की पेपर द्यायला जाताना सोनाली हिने तिला सांगितले की तू ऑटोमध्ये जा, मी दादा सोबत येतो. त्यानंतर मी परीक्षा केंद्रावर पोहचली परंतु सोनाली पेपर द्यायला केंद्रावर आलीच नाही.
आईवडिलांनी आजूबाजूचे परिसर व नातेवाईकांकडे विचारपूस केली असता मुलीचा काही सुगावा लागला नाही. त्यामुळे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार त्यांनी वणी पोलीस ठाण्याच्या नोंदवली. पोलिसांनी कलम 137(2) नुसार गुन्हा दाखल करून मुलीचे शोध घेणे सुरू केले आहे.