वणी टाईम्स न्युज : संपूर्ण वणी उप विभागात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन व तस्करीचे व्यवसाय सुरू आहे. महसूल अधिकाऱ्यानं चकमा देण्यासाठी वाळू माफिया नवनवीन फंडे आजमावत आहे. संशय येऊ नये म्हणून ट्रॅक्टर आणि हायवा ट्रकच्या जागी छत्तीसगढ प्रमाणे पल्ल्याच्या ट्रकमध्ये रेती तस्करीचा फंडा वापरला जात आहे. अशाच एका ट्रकमध्ये रेती वाहतूक करताना मारेगावचे तहसीलदार उत्तम नीलावड यांनी गुरुवारी सकाळी सावंगी शिवारात पकडुन 13 ब्रास रेती व ट्रक जप्त केला.
वर्धा नदीचे सावंगी घाटातून अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार उत्तम निलावाड यांना मिळाली. माहितीवरुन तहसीलदार यांनी तलाठी, कोतवाल व इतर कर्मचाऱ्यासोबत सावंगी शिवारात सापळा लावला. सकाळी 8.30 वाजता दरम्यान MH40 CT 0776 नंबर प्लेट असलेला TATA LPT 4225 ट्रक अडवून तपासणी केली असता त्यात अंदाजे 13 ब्रास रेती आढळून आली.
तहसीलदार यांनी ट्रक चालकास नाव पत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव माधव सांगितले. रेती वाहतुकीबाबत परवाना व रॉयल्टीची मागणी केली असता ट्रक चालकाकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाही. त्यामुळे महसूल पथकाने सदर रेती भरलेला ट्रक जप्त करून मारेगाव तहसील कार्यालय आवारात उभा केला. रेती वाहतूक करताना पकडलेला ट्रक हा मो. अशफाक मो. हनीफ अंसारी यांच्या नावाने असल्याचे कळते. तसेच ट्रकचे रजिस्ट्रेशन परिवहन विभागाचे टेकानाका कामठी रोड नागपूर कार्यालयात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रेती माफियाने डोकं वर काढले
वणी उप विभागात एकही रेती घाटाचे अद्याप लिलाव झालेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू आहे. वणी शहरात दररोज रात्रीच्या वेळी रेतीचे ट्रॅक्टर व ट्रक जागोजागी खाली होत आहे. वाळू तस्करांनी वर्धा नदी व पैनगंगा नदीचे अक्षरशः लचके तोडले आहे. महसूल व पोलीस विभागात बसलेले झारीतील शुक्राचार्य या वाळू माफियांना पाठबळ देत असल्याची चर्चा आहे. काही वाळू माफियांच्या राजकीय पक्षांशी संबंध असल्याचे बोलले जाते.