वणी टाईम्स न्युज : हल्ली लग्नसराईचे दिवस असल्याने एसटी बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नेमकी हीच संधी साधून चोरटे सक्रिय झाले आहे. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या पर्समधून सोन्याची पोत व रोख रक्कम लंपास केल्याची घटना 21 मे रोजी मारेगाव येथे घडली. घटनेबाबत फिर्यादी शोभा ईश्वर मोहुर्ले (40), राह. डोर्ली हिने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
पीडित महिला यवतमाळ जाण्यासाठी मारेगाव येथून दुपारी 2.45 वाजता वणी अकोला बस मध्ये बसली. बसमध्ये तिकीट काढण्यासाठी तिनं आपले बॅग उघडले असता त्यामध्ये ठेवलेलं छोटी पर्स दिसून पडली नाही. त्या पर्समध्ये महिलेने साडे सात ग्रामची सोन्याची पोत व 6 हजार रुपये नगद ठेवले होते. बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी अज्ञात चोरट्याने पर्स मधून 50 हजाराची पोत व 6 हजार रोख असे 56 हजाराच्या मुद्देमाल लंपास केला.
तक्रारदार महिलेने यवतमाळ येथून परत येऊन 22 मे रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 303(2) नुसार गुन्हा दाखला करून तपास सुरू केला आहे. घटनेच्या आदल्या दिवशी वणी बस स्थानकावरून चंद्रपूर येथील एका महिलेच्या पर्समधून साडे तीन तोळ्याची सोन्याचं मंगळसूत्र चोरल्याची घटना उघडकीस आली होती.
बसमध्ये चढताना बाळगा सावधानी
बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिला चोरट्यांची गँग सक्रिय झाल्या आहेत. या गँगच्या टार्गेटवर महिला प्रवाशी असतात. बसमध्ये चढताना गँगच्या महिला आजूबाजूला गराडा घालून प्रवाशी महिलेच्या बॅगमधून दागिने लंपास करतात. त्यानंतर त्या बसमध्ये न चढता तिथून पसार होतात. बसमध्ये चढताना गर्दी असल्यास बॅग किंवा पर्स पाठीमागे न लटकवता आपले समोर ठेवा. बसची वाट पाहत असताना आजुबाजूला संशयित महिला दिसल्यास तत्काळ त्या ठिकाणांहून बाजूला खुल्या जागेवर उभ्या रहावे.