वणी टाईम्स न्युज : वणी घुग्गुस मार्गावर मंदर शिवारात निलगिरी बन समोरील धाब्याची जाळपोळ आणि धाबा मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या धाबा चालकाच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात मंदर गावातील अनेक आरोपींविरुद्ध अवैध जमाव, दंगा, जीवे मारण्याचा प्रयत्न, आग लावून नुकसान, धमकी देण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे. निलेश संतोष सातपुते, गोलू दुरुतकर, अश्विनी कपिल आत्राम, गजानन परसुतकर, भोला लोणारे, प्रमोद बोथले, कपिल आत्राम सर्व रा. मंदर तालुका वणी तसेच अनोळखी एक असे गुन्हा दाखल झालेले आरोपीचे नाव आहे.
धाब्यामध्ये अवैधरीत्या दारु विक्रीच्या आरोपावरून मंदर येथील शेकडो महिला पुरुषांनी मंगळवार 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता निलगिरी बन समोरील बाबू भैया का ढाबा नामक हॉटेलमध्ये अचानक हल्ला चढवून तेथील सामानाची नासधूस करून धाबा पेटविला. एवढंच नव्हे तर जमावाने धाबा चालक दिलीप ओझा व त्याचे भाऊ चंदन ओझा याला बेदम मारहाण करून जळत्या धाब्यामध्ये ढकलून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती वेळीच पोलिसांना मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.
घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी धाबा संचालक दिलीप सूरजप्रकाश ओझा (30) रा. कोंडावार ले आऊट, जुना वाघदरा ता. वणी यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीत त्यांनी 40 ते 45 महिला व 20 ते 25 युवक व पुरुषांनी त्याच्या मालकीच्या धाबा (हॉटेल) मध्ये अवैधरीत्या घुसून सामानाची नासधूस, बळजबरीने चोरी, लूट व जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे.
धाब्या मध्ये ठेवलेले ब्लू स्टार कंपनीचा फ्रिज किंमत 40 हजार, अल्विन कंपनीचा फ्रिज किंमत 12 हजार, प्लास्टिकचे डायनिंग टेबल व खुर्च्या किंमत 5 हजार 500, काउंटर 6 हजार 500, गॅस शेगडी, फॅन, ट्युबवलाईट, कुलर किंमत 6 हजार 800, इलेक्ट्रिक मीटर, स्वयंपाक करण्याचे साहित्य 2 लाख 60 हजार रुपये, नगदी 8 हजार, पर्समधील पॅनकार्ड, आधार कार्ड, एटीएम, ड्रायव्हिंग लायसन्स आणि रोख 900 रुपयांचा नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून सर्व आरोपींवर भारतीय न्याय सहिंतेच्या कलम 189(2), 191(1), 191(3), 191(3), 119(1), 326(f), 115(2), 324(4), 324(5), 351(2), 351(3) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींकडून धाबा जाळपोळ करताना व धाबा चालकाला बेदम मारहाण करताना अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. व्हायरल व्हिडिओची तपासणी केल्यानंतर आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटनेचा पुढील तपास पीएसआय सुदाम आसोरे करीत आहे.