वणी : मारेगाव तालुक्यातील जळका शेत शिवारात एका शेतातील कोठ्यात साठवून ठेवलेला 10 क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. शेतमालक अमोल मनोहर चटकी (35) रा. जळका यांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारकर्ते अमोल चटकी यांचे जळका येथे शेती आहे. त्यांच्या शेतातील कोठ्यात त्यांनी 20 क्विं. कापूस साठवून ठेवला होता. दिनांक 10 एप्रिल रोजी अमोल नेहमीप्रमाणे सायंकाळी 7 वाजता गुरांचा चारापाणी करून शेतातून परत घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता अमोल हा शेतात गेला असता त्याला कोठ्याचा दाराला लागलेला कुलूप तुटून दिसला.
शेतमालक अमोल चटकी यांनी कोठ्यात जाऊन पाहणी केली असता तिथे ठेवलेल्या 20 क्विंटल कापसापैकी अंदाजे 10 क्विंटल किमत 65 हजार रुपये कापूस कुणीतरी चोरून नेल्याचे दिसले. कोठ्याच्या बाहेर चारचाकी वाहनाचे टायरमार्क दिसून आल्याने कुणीतरी अज्ञात चोरट्याने रात्रीच्या अंधारात कापूस चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यामुळे फिर्यादी यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 380, 461 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.