वणी टाईम्स न्युज : मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतील एका डोलोमाईट कंपनी मॅनेजरला 5 जणांनी मिळून काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. गणेशपुर (खडकी) येथील ईशान कॅल्शी डोलोमाईट कंपनीचे मॅनेजर विकास सिंग श्रीहरी किसन सिंग (45), रा. मोहल्ला कल्याणसिंह धिकौली, ता. मवाना, जि. मेरठ, उत्तर प्रदेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपुर येथील निलेश बेलेकर (30) व इतर 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार आरोपी निलेश बेलेकर याचा विट तयार करण्याचा कारखाना असून ईशान कॅल्शी डोलोमाईट कंपनीमधून निघालेली राख हा विटा बनविण्यासाठी नेत असतो. त्याच्याकडे राखेचे 24 हजार रुपये दोन वर्षापासून थकीत असून कंपनीचे अकाउंट व त्यांनी अनेकदा फोन करून त्याच्याकडे थकीत रकमेची मागणी केली. त्यामुळे नीलेश हा राग धरून होता.
दिनांक 25 मे रोजी फिर्यादी हा कंपनीचे सँपल घेऊन रात्री 8.20 वाजता एस. टी. बसने गणेशपुर पोहचला. तिथून कंपनीमध्ये जाण्यासाठी कंपनीचा सिक्युरिटी गार्ड रविकांत चव्हाण हा मोटरसायकल घेऊन आला होता. दरम्यान निलेश बेलेकर व त्याच्या सोबत इतर 4 ते 5 जण काठ्या घेऊन आले व तुम्ही बाहेरचे लोक येथे येऊन दादागिरी करतात असे म्हणून काठीने मारहाण केली. निलेश सोबत आलेले अंदाजे 20 ते 25 वयोगातील आरोपीने सुद्धा काठीने फिर्यादीच्या पाठीवर जबर मारहाण केली.
त्याच वेळी कंपनीचे सुरक्षा रक्षक रविकांत यांनी त्यांना सोडवून दुचाकीवर बसवून कंपनीत नेले. घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी विकास सिंग यांनी कंपनीच्या मालकाला विचारविमर्श करुन मुकुटबन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीसांनी आरोपी निलेश बेलेकर व अनोळखी 4 आरोपीवर कलम 189(2), 189(4), 190, 115 (2), 352, 351 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.