वणी टाईम्स न्युज : रस्त्यावर कुत्र्याला पोळी टाकण्यावरून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर मारहाण व जातीवाचक शिवीगाळ पर्यंत पोचले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांवर अनुसूचित जाती व अनसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अट्राॅसिटी) व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सिंधू चंपत ठमके, प्रशांत चंपत ठमके, चंपत गणुजी ठमके व सोनू प्रशांत ठमके सर्व रा. पठारपुर, ता. वणी असे आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी विजय निंबाजी गेडाम रा. पठारपुर, ता. वणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी त्यांचा मुलगा वृषभ गेडाम हा रस्त्यावरील कुत्र्याला पोळी टाकत होता. त्याच वेळी शेजारी राहणारा प्रशांत ठमके हा रस्त्यावर काठी आपटत कुत्र्याला मारण्यासाठी आला. फिर्यादी यांनी मुक्या प्राण्याला कशाला मारते अशी विचारणा केली असता कुत्र्यामुळे आम्हाला त्रास होतो, असे म्हणून त्याच्यासोबत वाद घालून फिर्यादी व त्याच्या मुलाला मारहाण केली. तसेच प्रशांत ठमके व त्याची आई, वडील व बायकोने फिर्यादी सोबत जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांच्या मुलाच्या डोक्यावर काठीची मार लागल्याने त्याला वणी व नंतर नागपूर येथे ग्रीनसिटी हॉस्पिटलमध्ये त्याच्या डोक्याची शल्यक्रिया करण्यात आली. त्यानंतर 25 जानेवारी 2025 रोजी फिर्यादी विजय निंबाजी गेडाम यांनी मुकुटबन पोलीस ठाण्यात गैरअर्जदार सिंधू चंपत ठमके (55), प्रशांत चंपत ठमके(30), चंपत गणुजी ठमके (63) व सोनू प्रशांत ठमके (26) सर्व रा. पठारपुर विरुध्द तक्रार नोंदवली. पोलिसांनी गैर अर्जदार विरुध्द अनुसूचित जाती व अनसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6, 3(2)(va), 3 (2)(5), 3(1)(s), 3 (1)(r) व कलम 3(5), 118(2) BNS नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे करीतआहे.