सुशील ओझा, मुकुटबन : झरी तालुक्यातील गणेशपुर (खडकी) येथील एका चुना कंपनीतील अकाउंट मॅनेजर यांनी मजुरांना वाटप करण्यासाठी कंपनीतून घेतलेले 3 लाख 40 हजार रुपये परस्पर गहाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्लॅन्ट प्रबंधक यांनी केलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये आरोपी अकाऊंटेंट संजय मधुकर धोटे (41) रा. नेहरू नगर, टाकळी पोलीस लाईन जवळ, नागपूर ह.मु. राम मंदिर जवळ मुकुटबन विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार गणेशपुर (खडकी) येथील ईशान कॅल्सी प्रा. ली. या चुना उत्पादन कंपनीत संजय मधुकर धोटे हा अकाऊंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. त्याच्याकडे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे दैनिक, साप्ताहिक व मासिक पेमेंट करण्याचे काम देण्यात आले होते. कामगारांना पगार देण्यासाठी त्याला दर महिन्याला कंपनीतून रोख रकम दिली जाते.
दिनांक 29 जुलै रोजी कंपनीतील काही कामगारांनी पगार मिळाली नाही म्हणून कंपनीच्या गेटवर हंगामा करीत होते. कंपनीचे प्रबंधक विकास सिंग यांनी विचारणा केली असता त्यांना पगार मिळाली नसल्याचे सांगितले. तेव्हा कंपनी मॅनेजर विकास सिंग यांना अकाऊंटेन्ट संजय धोटे याला फोन करुन विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले. कंपनी मॅनेजर यांनी अकाउंट तपासले असता संजय धोटे यांनी कंपनीतून कामगारांना देण्यासाठी 5 लाख 46 हजार 942 रुपयांची उचल केली, तसेच त्यापैकी त्यांनी मजुरांना फक्त 2 लाख 7 हजार 468 रुपये पगार वाटप केली. उर्वरित 3 लाख 39 हजार 474 रुपये अकाऊंटेन्ट संजय धोटे याच्याकडे शिल्लक असल्याचे निदर्शनास आले.
आरोपी संजय धोटे यांनी कंपनीची रक्कम परस्पर गहाळ केल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रबंधक विकास सिंग यांनी ईशान कॅल्सी प्रा. ली. चे डायरेक्टर ईशान अग्रवाल यांना माहिती दिली. तसेच त्यांच्या आदेशाने आरोपी अकाउंट मॅनेजर संजय मधुकर धोटे विरुद्ध कंपनीचे 3 लाख 39 हजार 474 रुपये स्वतच्या फायद्याकरिता अपाहार केल्याची तक्रार मुकुटबन पोलीस ठाण्यात नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 316(4) व 316(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष मनवर करीत आहे.