वणी टाईम्स न्युज : मार्फिंग केलेले अश्लील फोटो नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन महिलेकडून अडीच लाख रुपये खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाआहे. पिडीत महिलेच्या तक्रारीवरून आरोपी युवकाविरुद्ध वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र पाचभाई (30) रा. कातलाबोडी, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारकर्त्या 40 वर्षीय महिलेला एप्रिल 2023 मध्ये एका अनोळखी नंबरवरुन फोन कॉल आला होता. समोरील व्यक्तीने मी तुमचा नातेवाईक बोलत आहे, असं म्हणून महिलेसोबत बोलचाल सुरु केली. त्यानंतर दोघांमध्ये बरेचदा फोन वर संभाषण होऊन त्याच्या रूपांतर मैत्रीमध्ये झाला. काही महिन्यानंतर आरोपीने अर्जंट काम असल्याचा बहाणा करून अडीच लाख रुपयांची मदत मागितली. परंतु महिलेने माझ्याकडे एवढे पैसे नाही, मी देवू शकत नाही असं उत्तर दिले.
आरोपी महिलेला वारंवार फोन करून पैश्याची मागणी करु लागला म्हणून तिनं फोनवर बोलणं बंद केला. दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी आरोपीने महिलेला फोन करून मी तुझी मार्फ केलेली अश्लील फोटो तुझ्या नातेवाईकांना पाठविन तसेच सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करीन. तुझी बदनामी करायची नसेल तर मला अडीच लाख रुपये दे. अशी धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पिडीत महिलेने याबाबत 30 ऑगस्ट रोजी वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कलम 308 (3) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यातआला.