सुशील ओझा झरी : मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक शोषण केल्याची घटना मंगळवार 1 ऑक्टों रोजी उघडकीस आली. पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी युवकाविरुध्द मुकुटबन पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. गणेश पांडुरंग आत्राम (24) असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपीचे मुलीचे घरी नेहमी येणेजाणे होते. यातूनच आरोपीने मुलीसोबत ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले. मुलीचे वय कमी असल्यामुळे आपण दोन वर्षांनी लग्न करु, असा भूलथापा देऊन आरोपीने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वारंवार संबंधामुळे मुलीला गर्भ राहिला. मासिक पाळी थांबल्याने मुलीने गावातील आशावर्कर हिला सांगितले. आशावर्कर हिने मुलीला घेऊन वणी ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता मुलीला 4 महिन्याचा गर्भ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पिडीत मुलीने मुकुटबन पोलिसांना दिलेल्या बयानात तिनं वणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार केल्याचे सांगितले. पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुध्द कलम 237(2)(N),417 सहकलम 4,6 पॉक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हिरे व कॉन्स्टेबल दीपक ताटे करीत आहे.