वणी टाईम्स न्युज : येथील जत्रा रोड परिसरात अवैधरीत्या गाईचे कत्तल व शेकडो गोवंश अवशेष आढळल्या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी रात्रीच 7 आरोपींना अटक केली. रविवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आठही आरोपींची जामिनावर सुटका केली. जाहीर अली मुबारक अली (40), मोहम्मद तौसीफ कुरेशी (34), शेख सगिर शेख इब्राहीम (30), मोहम्मद अनिश अब्दुल रशीद कुरेशी (50) इरफान खान शाबान खान (35), शाकीर खान शमशेर खान (27) सर्व रा. मोमिनपुरा, वणी व सय्यद जलील सय्यद कादीर (49) रा. रामपुरा वार्ड वणी असे गोवंश हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान शहरात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर विविध हिंदुवादी संघटना सक्रिय झाले आहे. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक संतोष तुलसीदास लक्षटीवार (30), रा इंदिरा चौक यांनी दिलेल्या फिर्याद वरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5A (1) नुसार गुन्हा दाखल केला. घटनेच्या विरोधात बजरंग दल, श्रीरामनवमी उत्सव समिती तर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन गोवंश हत्या करणाऱ्या आरोपी तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपीवर कारवाई न झाल्यास शहरात तीव्र आंदोलन व बंदचा इशारा श्री रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी दिला आहे.
वणी विधानसभेचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे भाजपचे राज्य स्तरीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पुणे येथे असताना वणी येथे घडलेल्या गोवंश हत्येच्या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनेची माहिती दिली आहे. तसेच यवतमाळचे एसपी कुमार चिंता यांना फोन करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.