जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेचे बंडखोर उमेदवार संजय खाडे यांनी अखेर आपल्या निर्णयावर ठाम राहून आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांना उत्सुकता होती की, संजय खाडे उमेदवारी मागे घेणार की, अपक्ष म्हणून निवडणूक आखाड्यात उतरणार. आणि अखेर संजय खाडे यांनी सोमवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील काँग्रेस व शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार विश्वास नांदेकर पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
यावेळी संजय खाडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे जाहीर करत शिवसेना जिल्हा प्रमुख नांदेकर यांनी यापुढे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा माझ्यासाठी विषय नाही, असे सांगून शिवसेना (उबाठा) पक्षाला ‘ जय महाराष्ट्र ‘ केल्याचे संकेत दिले. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेता मारेगावचे नरेंद्र ठाकरे यांनी 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा मत पत्रिकेवरून काँग्रेसचा निवडणूक चिन्ह गायब असल्याची खंत व्यक्त करून अपक्ष उमेदवार संजय खाडे यास पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय खाडे, शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, काँग्रेस नेता नरेंद्र ठाकरे, पुरुषोत्तम आवारी, प्रशांत गोहोकर, गौरीशंकर खुराना, तेजराज बोढे, पवन एकरे, शंकर वऱ्हाटे, शिवसेना झरी तालुका प्रमुख चंद्रकांत घुघुल, शिवसेना वणी तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, शिवसेना मारेगाव तालुका प्रमुख संजय आवारी, सुनील वरारकर तसेच काँग्रेस व शिवसेनेचे अनेक कार्यकर्ता उपस्थित होते. संजय खाडे यांच्या उमेदवारीमुळे वणी विधानसभेत आता चौरंगी सामना होणार यात शंका नाही.