वणी: वर्दळीच्या आणि नागरी वस्तीच्या ठिकाणी अवैधरीत्या विना परवाना फटाक्यांची विक्री करणाऱ्या दोन दुकानावर व एक गोडाऊनवर महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकली. नायब तहसीलदार रवींद्र कापशीकर यांचे नेतृत्वात पथकाने मंगळवार 21 नोव्हे. रोजी दुपारी ही कारवाई केली. या कारवाईत गांधीचौक व सर्वोदय चौकातील दोन दुकानातून ट्रक्टर ट्राली भरून फटाके जप्त करण्यात आले. यावेळी वसंत गंगा विहार परिसरात पालकर यांचे फटाकाच्या गोडाऊनला सील ठोकण्यात आली. मात्र दिवाळीनंतर करण्यात आलेल्या या कारवाईमुले साप निघून गेल्यावर काठी आपटणे सारखे असल्याचे बोलले जाते.
प्राप्त माहितीनुसार फटाके विक्रेत्यांना महसूल विभागाकडून दरवर्षी परवाना नुतनीकरण केले जाते. तर नगरपालिकेतर्फे दिवाळी हंगामात फटाका स्टाल लावण्यासाठी 15 दिवसांसाठी जागेचा लिलाव केल्या जाते. वणी शहरात दिवाळीच्या 8 दिवसापूर्वी यात्रा मैदान परिसरात फटाक्याची दुकाने लावली जाते. मात्र काही फटाका विक्रेता धोकादायकरित्या राहत्या घरातून किंवा नागरी वस्तीमध्ये असलेल्या आपल्या दुकानातूनच फटाक्याची विक्री करीत असल्याची तक्रार उप विभागीय अधिकारी डॉ. नितीन हिंगोले यांना मिळाली होती. त्यामुळे उप विभागीय अधिकारी यांनी नायब तहसीलदार रवींद्र कापशीकर यांना अवैध फटाका विक्री सेंटरवर कारवाईचे आदेश दिले.
महसूल विभागाच्या पथकाने गांधी चौक येथे कुल्दीवार यांचे दुकानावर धाड टाकून तिथून फटाक्याचा स्टॉक जप्त केला. त्यानंतर पथकाने सर्वोदय चौक येथील नागपुरे सायकल स्टोर्स या प्रतिष्ठानवर धाड टाकून फटाके जप्त केले. शहरात फटाका विक्रीचे मोठे विक्रेते पालकर फटाका सेंटर यांचे वसंत गंगा विहार परिसरात असलेले फटाका गोडावूनवर धाड टाकून महसूल पथकाने गोडावून सील केले. विशेष म्हणजे काही फटाक्या विक्रेत्यांकडून संपूर्ण वर्ष व दिवाळीच्या हंगामात शहरातील वर्दळीच्या ठिकाणी फटाके विक्री होत असताना महसूल विभागाला दिवाळीनंतर कारवाई करण्याची जाग आली. जप्त करण्यात आले फटाके नगर परिषद आरोग्य विभागाच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे. परंतु नागरिकांचे जीव धोक्यात टाकून फटाका विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्द महसूल विभागाने पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार नोंदविली नाही.