जितेंद्र कोठारी, वणी : शिव महापुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची वणी येथे सुरू असलेली श्री काशी शिव महापुराण कथेचा लाभ घेण्यासाठी गुरुवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. कथेच्या सहाव्या दिवशी राज्यातून नव्हे तर पर राज्यातून लाखोच्या संख्येने शिवभक्त कथा स्थळी दाखल झाले. वणी लगत परसोडा येथे 27 जानेवारी पासून सुरू काशी शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी दररोज 80 हजार ते 1 लाख भाविक मिळेल त्या वाहनाने कथा स्थळावर येत आहे.
भाविकांची गर्दी बघता वणी, पांढरकवडा, यवतमाळ एस. टी. आगारातून कथास्थळ पर्यंत जादा बसेस सोडण्यात येत आहे. शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी महा शिवपुराण कथेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शुक्रवारी भूतो न भविष्यती गर्दी राहण्याचा अंदाज बांधला जात आहे. कथेसाठी आलेल्या लाखों भाविकांच्या जेवणाची व्यवस्था आयोजक समिती तर्फे करण्यात आली आहे. शिवाय अनेक दानशूर लोकांकडून मोफत फळ, बिस्कीट, पाणी, ब्लँकेटचे वाटप करण्यात येत आहे.
शर्मिलाताई ठाकरे यांच्या हस्ते शिव आरती
शिवपुराण कथेचा लाभ घेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आज वणीत दाखल झाल्या. गुरुवारी कथा समापन नंतर शर्मिलाताई यांनी मंचावर जाऊन पंडीत प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या हाताने शिव आरती करण्यात आली.
भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
शिव महापुराण कथेचा लाभ घेण्यासाठी येणारे लाखों भाविकांची सुरक्षा तसेच वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी स्वतः कथास्थळी येऊन उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रेसोबत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. वणी शहरापासून तर मारेगाव पर्यंत होणारी गर्दी बघता अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एसडीपीओ सह जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड जवानांची ड्युटी लावण्यात आली आहे.