वणी टाईम्स न्युज: शनिवारी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा अनपेक्षितरीत्या पराभव झाला. पराभवनंतर देशमुखवाडी येथील निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे अश्रू अनावर झाले. आपल्या संबोधनात अनेकवेळा ते भावूक झाले. निवडणूक हा हारजीतचा खेळ आहे, त्यामुळे पराभव झाल्याचा दुःख नाही. मात्र पक्षातीलच काही गद्दारांमुळे पराभवाचा सामना करावा लागला याची खंत असल्याचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.
आमदारकीच्या दोन टर्ममध्ये संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मतदार संघात भूतो न भविष्यती असे विकास कामे केले. मागील 10 वर्षात त्यांनी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला. दोनदा आमदारकी भूषवणारे संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे साधे राहणीमान व जनतेशी थेट संपर्क त्यांची जमेची बाजू होती. मतदार संघातील तब्बल 78 हजार महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभही मिळाला होता. त्यामुळे संपूर्ण वणी मतदार संघात व्यक्तिशः संजीवरेड्डी बोदकुरवार विरुद्ध कोणतीही नाराजी दिसून पडली नाही.
भाजप कडून वणीची उमेदवारी मिळण्यासाठी संजीवरेड्डी बोदकुरवारसह भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे ही इच्छुक होते. मात्र पक्षाने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात संजीवरेड्डी बोदकुरवार हे Winning Candidate ठरले. त्यामुळे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी देण्यात आली. याच कारणाने पक्षातील काही नेत्यांनी निवडणुकीत भाजप उमेदवाराला अपेक्षित सहकार्य न करता विरोधी पक्षाला मदत केल्याचा आरोप पराभूत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला.
वणी विधानसभा क्षेत्र हा कुणबी समाज बहुल मतदार संघ आहे. लोकसभा निवडणूक प्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जातीचा कार्ड वापरण्यात आला. भाजप प्रचार कार्यालयात एका कार्यकर्त्यांनी कुणबी समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करून मतदार संघातील कुणबी समाजाचे मत विभाजन करण्यात विरोधकांना यश आले. मात्र पराभवाला खचून न जाता मतदार संघात अधिक जोमाने पक्ष मजबूत करण्याचा काम करणार असल्याचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी कार्यकर्त्यांना वचन दिले. तसेच यापुढे गद्दारांना पक्षात थारा दिला जाणार नसल्याचा इशारा संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिला.
पहा व्हिडिओ –