जितेंद्र कोठारी, वणी : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे सोमवारी 18 डिसे. रोजी वणी येथे भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये वणी, मारेगाव व झरी तालुक्यातून सहभागी झालेल्या हजारो शिवसैनिक व शेतकऱ्यांनी सरकार आणि त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाप्रति आपला तीव्र रोष नोंदविला. मशाल, झेंडा ,पताका आणि सजविलेल्या बैलबंड्या व ट्रॅक्टर हे या मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करताना शिवसेना नेता भास्कर जाधव यांनी शेतकऱ्यांना खचून जाऊन आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. ‘संकटे येतात आणि जातात. या संकटांचा खंबीरपणे सामना करा. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. रोष प्रगट करायचा असेल तर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा करा आणि हे मिंधे सरकार उलथवून टाका. येणारे सरकार हे आपलेच असेल, जे संपूर्णपणे ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असेल. निवडणुकीपूर्वी भाजपने खोटी आश्वासने दिली. आता त्याच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन यावेळी भास्कर जाधव यांनी केले.
यावेली मशाल मोर्चाचे संयोजक व माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी मिंधे सरकार हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे आणि केवळ काही पुंजीपती लोकांसाठी काम करीत असल्याचा घणाघात आरोप केला. मिंधे सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत आपला लढा असाच चालू राहील असा विश्वास त्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना दिला.
विशेष म्हणजे शिवसेना (उबाठा) आयोजित मशाल मोर्चात वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन जाहीर पाठींबा दिला. आम्ही उद्धवजींसोबतच आहोत, या सरकारचा पायउतार करीत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
वाद्यांच्या निनादात आणि घोषणांच्या गजरात हा मोर्चा वणी येथील मुख्य रस्त्यावरुन निघाला तेव्हा सर्वांचं लक्ष त्याने वेधून घेतलं. रस्त्याच्या कडेने असलेल्या नागरिकांनी या मोर्चाला पाठिंबा दिला. टिळक चौकात या भव्य दिव्य असलेल्या मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणपत लेडांगे यांनी केले. संचालन तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे यांनी केले. संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद पाटील, दिलीप भोयर, वणी विधानसभा संपर्क प्रमुख विजयानंद पेंडणेकर, जिल्हा संपर्कप्रमुख राजेन्द्र गायकवाड, तसेच मोचाचे आयोजक तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांचेसह काही पदाधिकाऱ्यांनी भाषण केली. या मोर्चामध्ये संजय देरकर, सुनिल कातकडे, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, यांच्यासह वणी, मोरगाव व झरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती. नेत्यांच्या मार्गदर्शनानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.