वणी टाईम्स न्युज : आम्हाला 5 लाख रुपये द्या, नाही तर तुमच्या लग्न झालेल्या मुलीचा, नातवाचा, जावयाचा किंवा तुमचा मुलाच्या व मुलीचा खून करु. यापैकी कोणाचंही गेम वाजवता आला नाही तर तुम्ही जीव द्यायला तयार रहा. तुम्हाला तुमचा जीव आवडत असेल तर आम्हाला (संघटेनला) 5 लाख देण्याचे करावे, ही विनंती. असा धमकीवजा विनंती पत्र शहरातील पद्मावती नगरी येथे वास्तव्यास असलेले वेकोलि कर्मचाऱ्याला शुक्रवारी रात्री 8 वाजता त्यांच्या घराच्या अंगणात मिळाला. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या लिफाफ्यात बजरंग दल संघटनेच्या नावाने हा पत्र वेकोलि पिंपळगाव येथे ड्युटीवर असलेले राजकुमार खोले यांच्या घरात टाकला. खंडणी व जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खोले कुटुंब दहशतीत आले असून त्यांनी वणी पोलिसात या बाबत माहिती देऊन सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार वेस्टर्न कोलफिल्डच्या पिंपळगाव ओपनकास्ट खाणीत ऑफिस सुप्रिडेंट म्हणून राजकुमार खोले हे घूग्गुस मार्गावर पद्मावती कॉलनीत कुटुंबासह वास्तव्यास आहे. शुक्रवारी नाईट ड्युटी असल्याने रात्री 8 वाजता घराबाहेर निघाले असता घराच्या अंगणात एक पांढऱ्या रंगाचा लिफाफा पडून दिसला. त्यांनी लिफाफा खोलून बघितला असता त्यात एक कागद होता. राजकुमार खोले यांनी कागदावरील मजकूर वाचताच घाबरून गेले. पत्रामध्ये तुम्ही उद्या 5 लाख रुपये द्या नाही तर तुमच्या कुटुंबाला किंवा तुम्हाला ठार मारणार. अशी धमकी देण्यात आली.
विशेष म्हणजे खंडणीखोराने पत्राला ‘सस्नेह विनंती अर्ज’ असा टायटल दिला आहे. तसेच पत्राच्या सुरुवातीला प्रती, श्री राजकुमार भीमराव खोले, त्यानंतर विषय -आमच्या जे तुमच्याकडे अपेक्षा आहे, ते पूर्ण करणे बाबत, अस लिहिले आहे. एवढंच नव्हे तर खंडणीखोराने स्वतला अर्जदार म्हणून सहकारी तुमच्या खाली काम करणारा ज्युनिअर (संघटन बजरंग दल) असही पत्रामध्ये लिहिले आहे.
हे पत्र जनहितार्थ किंवा सार्वजनिक नसून पोलिसांना किंवा कोणाला दाखवू नये आमची टीमची नजर तुमच्यावर आहे. 5 लाख रुपये एका लाल रंगाच्या पिशवीमध्ये शनिवारी सुशगंगा कॉलेजच्या बाहेर पिंपळाच्या झाडाखाली बुडाला बांधून ठेवणे. तसेच स्वतचं पासपोर्ट फोटो व मोबाईल नंबर चिठ्ठीत लिहून ठेवण्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तुम्ही जर पैसे दिले नाही तर एका हप्त्यात तुम्हाला कायम जगातून सुट्टी देण्यात येईल. अशी धमकीही पत्रात देण्यात आली.
खंडणी व जीवे मारण्याची धमकी बाबत पीडित राजकुमार खोले यांनी शनिवारी उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी पद्मावती नगरी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र तीन दिवसानंतरही पोलिसांना आरोपीबाबत कोणताही सुगावा लागला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे खोले कुटुंबीय अजूनही दहशतीच्या छायेखाली जगत आहे.