यवतमाळ : राज्यात गुटखा व सुगंधित तंबाखूचे उत्पादन, विपणन आणि विक्रीवर प्रतिबंध असताना पर प्रांतातून येणारी तंबाखूची मोठी खेप स्था.गुन्हा शाखा पथकाने जप्त केली आहे. यवतमाळ दारव्हा रोडवरील घाटात करण्यात आलेल्या या कारवाईत एलसीबी पथकाने तब्बल 52 लाख 37 हजाराचा सुगंधित तंबाखू साठा आणि 16 लाख किमतीचा चारचाकी आयशर वाहन जप्त केला आहे. प्रतिबंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक केल्या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार दारव्हा मार्गे यवतमाळ येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूने भरलेले एक आयशर वाहन येणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. माहितीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून तसेच अन्न व औषध विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन पथकाने शनिवारी 6 एप्रिल रोजी दारव्हा रोडवर चीद्दरवार कंस्ट्रक्शन समोर सापळा लावला. माहितीप्रमाणे दारव्हा कडून येणाऱ्या MH-40-AK-7045 क्रमांकाच्या आयशर वाहनाला अडविले. अन्न सुरक्षा अधिकार्याच्या समोर वाहनाची झडती घेतली असता त्यात मजा 108 तंबाखु 50 ग्राम वजनाचे 2000 डब्बे, 200 ग्राम वजनाचे 2800 डब्बे, ईगल 108 तंबाखूचे 40 ग्राम वजनाचे पाऊच असलेले 6 पोते, ईगल 108 तंबाखू 200 ग्राम वजनाचे 1600 मोठे पॅकेट, तसेच सुगन्धित तम्बाखू 3 किग्रा. वजनाचे 500 पॅकेट असे एकून 52 लाख 37 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल आढळला.
एलसीबी पथकाने ट्रक चालक तोरन सुखराम गहाणे (25) रा. वार्ड क्र. 3 मु. उचापूर, पोस्ट काकोडी, ता. देवरी, जि. गोंदिया यास अटक करून आयशर वाहन किमत 16 लाख रुपये जप्त करून यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथ आणले. अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांच्या फिर्यादवरून आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा मानके व भाद्वी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात पो.नि. स्था. गु. शाखा आधारसिंग सोनोने, सपोनि अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडूरे, योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके यांनी पार पाडली.