वणी टाईम्स न्युज : उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी टॅक्सी चालकाचा बळजबरीने अपहरण करुन मारहाण व चाकुच्या धाकावर 20 हजार रुपये लुटण्याची घटना पांढरकवडा मारेगाव मार्गावर खेकडवाई फाट्याजवळ गुरुवार 7 जून रोजी दुपारी 11.30 वाजता दरम्यान घडली. टॅक्सी चालक सलीम सुलतान गीलाणी (44), रा. करंजी जि. यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपी नरेश जयस्वाल, रा. यवतमाळ व इतर 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार टॅक्सी चालक सलीम सुलतान गीलाणी यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे मेक्झिमो चारचाकी वाहन असून ते पांढरकवडा ते वणी प्रवासी वाहतूक करतात. दिनांक 7 जून पांढरकवडा येथून प्रवासी बसून वणीकडे निघाला असता वाटेतच खेकडवाई फाट्याजवळ मागून आलेल्या एका स्कॉर्पिओ चारचाकी गाडी व एक मोटरसायकलने ने ओव्हरटेक करून त्यांच्या वाहणासमोर गाडी थांबविली. स्कॉर्पिओ वाहनातून यवतमाळ येथील नरेश जयस्वाल व इतर 8 अनोळखी तरुण उतरले व त्यांनी काही न सांगता चालक सलीम याला गाडी बाहेर काढून मारहाण करण्यास सुरु केले.
त्यानंतर मारहाण करणाऱ्या इसमाने त्याला बळजबरीने त्याच्याच मॅक्झिमो टॅक्सीमध्ये मागे बसवून स्कॉर्पिओ व दुचाकी सह घोगुलदरा फाट्याजवळ एका शेतात नेऊन मारहाण केली. यावेळी नरेश जैस्वाल यांनी फिर्यादीच्या पोटावर चाकू लावून त्याचा मोबाईल हिसकावून तसेच फोन पे चा पासवर्ड विचारून 18 हजार 900 रुपये बँक खात्यातून वळते केले. शिवाय फिर्यादीनुसार पैंटच्या खिशात असलेले 2 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.
आरोपी नरेश जैस्वाल यांनी फिर्यादी सलीम गिलाणी याला बळजबरीने त्यांच्या वाहनासह घाटंजी येथे त्याच्या ऑफिस मध्ये नेले. तिथे नरेश जैस्वाल याचा भाऊ राजेश जैस्वाल व त्याचे सोबत आलेले अनोळखी तरुणांनी त्याला पुन्हा मारहाण केली. एवढंच नव्हे तर पिडीत टॅक्सी चालक यास 2 तास ऑफिस मध्ये बसवून ठेवला. तसेच घडलेल्या घटनेबाबत पोलिसात रिपोर्ट दिली तर तुला बघुन घेईल, अशी धमकी दिली.
मारहाण व लुटीच्या घटनेमुळे घाबरलेल्या फिर्यादी यांनी वणी येथील त्याचा मित्राला फोन करुन घाटंजी येथे बोलाविले. त्यानंतर फिर्यादी यांनी सरकारी दवाखान्यात उपचार घेऊन मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नरेश जैस्वाल व त्याचे इतर 10 अनोळखी साथीदारांवर कलम 323, 326, 342, 395, 364(A), 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.