वणी टाईम्स न्युज : मतदार संघात केलेल्या विकास कामाच्या बळावर निवडणुकीत शंभर टक्के विजयी होण्याची शाश्वती असताना पक्षातील गद्दारांमुळे पराभवाचा सामना करावा लागला. माझा पराभव व्हावा यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी खुद मेहनत घेतली. असा घणाघात माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. निवडणुकीत ज्यांनी पक्ष विरोधी कारवाया केली, त्यांच्यावर नक्कीच कारवाई होणार. असा दम बोदकुरवार यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन मागील 10 वर्षात त्यांनी मतदार संघात केलेल्या कामाचा उल्लेख केला. 1985 पासून वणी मतदार संघाचा विकास थांबला होता. मात्र मागील 10 वर्षात मतदार संघाच्या विकासाला त्यांनी चालना दिली. वणीच्या विकासासाठी आणखी काही संकल्पना त्यांनी तयार केली होती. त्यामुळे आजच्या घडीला वणीला सत्तेतील आमदार असल्याची गरज होती. असे माजी आमदार बोदकुरवार यांनी सांगितले.
आमदार असताना निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा केली. अमीर गरीब, जाती पाती, पक्षाचा किंवा विरोधक याचा कधीही विचार केला नाही. प्रसिध्दीच्या हव्यासापोटी कधी गेलो नाही. मतदार संघातील लोकांचा अपार प्रेम माझ्या वाटेला आले. निवडणुकीत मला मतदान करणाऱ्या 80 हजार मतदारांचा मी आभारी आहे. विधानसभा निवडणुकीत माझा पराभव हा भाजपचा किंवा कार्यकर्त्यांचा नसून पराभवाची संपूर्ण जवाबदारी माझी आहे. निवडणुकीत पराभवाचा आम्ही निश्चितपणे चिंतन करणार आहोत. असे ही संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकारांना सांगितले.
पराभवाला खचून न जाता येणाऱ्या स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप हा नव्या जोमाने उतरणार असल्याचे बोदकुरवार यांनी स्पष्ट केले. यावेळी वणी मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांना विजयाची तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. वणी मतदार संघाच्या विकासासाठी आवश्यक असल्यास आमदारांना सहकार्य करण्याची ग्वाही माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली. पत्रकार परिषदेत माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारसह विजय पिदुरकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, रवी बेलुरकर, नितीन वासेकर उपस्थित होते.