वणी टाईम्स न्युज : मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील नेरड (पुरड) येथील शेतकरी विठ्ठल आनंदराव जूनघरी (51) यांच्या विजेचा शॉक लागून मृत्यू प्रकरणी शेत् मालक अनिल नानाजी कुचनकार (50) रा. नेरड विरुद्ध मुकुटबन पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक विठ्ठल जूनघरी याचे पुत्र अजित विठ्ठल जूनघरी यांनी शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, नेरड येथील शेतकरी विठ्ठल जूनघरी हा 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता बैलाचा चारा आणण्यासाठी बैलबंडी घेऊन गावातीलच संतोष आमने यांच्या शेतात गेला होता. आमने यांच्या शेतालगत नाल्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या बैलांना आणण्यासाठी विठ्ठल जूनघरी हा गेला असता नाल्याजवळ असलेले अनिल नानाजी कूचनकार यांच्या शेतातील ताराच्या कुंपणाला लागून टाकण्यात आलेल्या विजेच्या जिवंत ताराला स्पर्श होऊन त्याच्या जागीच मृत्यू झाला.
जमिनीवर टाकलेल्या जिवंत विद्युत तारांमुळे जीवितहानी होऊ शकते, असे माहीत असताना शेतकरी अनिल कुचनकार यांनी दिवसातही तार कंपाऊंड मध्ये वीज प्रवाहित केला. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूस अनिल कुचनकार कारणीभूत असल्याची फिर्यादी अजित विठ्ठल जूनघरी रा. नेरड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 105 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.