वणी टाईम्स न्युज : येथील साई मंदिर चौकात चोरडिया कॉम्प्लेक्स मधील हॉटेल रसोई मध्ये बुधवारी मध्यरात्री 1.15 वाजता भीषण आग लागली. या आगीत हॉटेल मधील सर्व फर्निचर व साहित्य जळून खाक झाला. सुदैवाने इमारतीच्या तळमजल्यावर असलेली इक्विटास बँक आगीच्या घटनेपासून थोडक्यात बचावली. आग लागल्याची माहिती मिळताच नगर परिषद अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले. दोन अग्निशामक वाहनाच्या मदतीने तब्बल 2 तासात आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांचे सह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
प्राप्त माहितीनुसार साईमंदिर चौक येथील नांदेपेरा मार्ग कॉर्नरवर 3 मजली इमारतीमध्ये तळ मजल्यावर इक्विटास बँक आहे. तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर हॉटेल रसोई आहे. नेहमी प्रमाणे हॉटेल मालक हॉटेल बंद करून घरी गेले होते. दरम्यान रात्री 1.15 वाजता पोलिसांना इमारतीमधून धूर निघत असल्याची सूचना मिळाली.पोलीस कर्मचारी साई मंदिर चौकात पोहचले असता त्यांना हॉटेलच्या पहिल्या माळ्यावर आगीचे लोण दिसून पडली.
पोलिसांनी तात्काळ नगर परिषद अग्निशमन विभागाला याबाबत कळविले. मात्र पाहता पाहता काही मिनिटात आगीने रौद्र रूप धारण केले. त्यानंतर काही वेळाने इमारतीत जोरदार विस्फोट झाला व हॉटेलच्या दर्शनी भागात लावलेले सर्व काच फुटले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच हॉटेल प्रबंधक तसेच बँकेचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकही जमा झाले होते. सुदैवाने आग हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचण्यापूर्वीच आटोक्यात आली. अन्यथा इमारतीला लागून एयु बँक व स्टेट बँकपर्यंत आग पोहचली असती तर मोठी घटना घडली असती.
बघा व्हिडिओ :