वणी : तालुक्यातील निवली (सुंदरनगर) येथील एका तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार सकाळी 6 वाजता उघडकीस आली. शुभम अरविंद खिरटकर (25) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार निवली येथील अरविंद खिरटकर यांना दोन मुलं आहे. त्यांना निवली येथे 9 एकर शेती आहे. मोठा मुलगा शुभम हा खाजगी वाहन चालक म्हणून काम करीत होता. बुधवारी रात्री शुभम हा घरी आला नव्हता. सकाळी 6 वाजता वडील अरविंद खिरटकर शेतात जाण्यासाठी निघाले असता त्यांना शुभमची दुचाकी रस्त्यावर उभी दिसली. त्यांनी इकडे तिकडे पहिले असता रस्त्याजवळ शेतात एका बाभळीच्या झाडाला शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
त्यांनी आरडाओरड केली असता गावातील नागरिक धावून आले आणि शुभमला खाली उतरविला. त्याला तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला. शुभमने आत्महत्या का केली या बाबत कुटुंबीयांनी अनाभिज्ञता व्यक्त केली आहे. घटनेबाबत शिरपूर पोलिसांना कळविण्यात आले असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
तरुण तरुणीची आत्महत्येच्या घटनेत वाढ
मागील काही दिवसांपासून वणी तालुक्यात 18 ते 25 वयोगटातील तरुण तरुणी तसेच 30 ते 45 वर्षातील पुरुष महिलांच्या आत्महत्येच्या घटनेत लक्षणीय वृद्धी झाली आहे. नैराश्य, प्रेम प्रकरण, घरगुती वाद, आर्थिक विवंचनेतून होणाऱ्या आत्महत्येच्या घटनांमुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.