वणी : पोलीस रेकार्ड वरील आरोपीकडून वणी पोलिसांनी विदेशी बनावटीची रिव्हाल्वर जप्त केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री राजूर भांदेवाडा मार्गावर घडली. शेतात वाढदिवसाची पार्टी करत असताना पोलिसांनी रेड करून आरोपीला ताब्यात घेतले. उमेश किशोरचंद राय (34) रा. महादेव नगरी चिखलगाव असे सराईत आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून Made in USA 7.5 लिहिलेली एक रिव्हाल्वर जप्त करून अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार राजूर भांदेवाडा मार्गावर मनोज कश्यप यांचे शेतात डीजे लावून नाचगाणे करून धिंगाणा करीत वाढ दिवस पार्टी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीवरून ठाणेदार अजित जाधव यांना माहिती देवून त्यांचेसह सपोनि दत्ता पेंडकर व स्टाफ सह पोलीस रात्री 2.30 वाजता राजूर भांदेवाडा मार्गावर श्मशान भूमी जवळ शेतात गेले. पोलिसांना बघून दारू पिऊन नाचणारे अनेक लोक तिथून पळून गेले. आरोपी उमेश राय हा पोलिसांना पाहून पळून जात असताना पळता पळता जमिनीवर पडून गेला. त्याच्या पाठलाग करीत असलेल्या पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन शेतातील घराजवळ लाईटच्या उजेडात आणले.
पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेवर लटकलेली विदेशी बनावटीची रिव्हाल्वर ज्याच्या वर Made in USA No. 11 तसेच उजव्या बाजूवर 7.65 round लिहिलेली पोलिसांनी मिळाली. सोबतच वाढदिवस पार्टी करीत असताना त्याच पिस्तुलमधून दोन राउंड हवाई फायर केल्याची कबुलीवरून पोलिसांनी कारतूसचे 2 खाली कव्हरही जप्त केले. आरोपीकडून पोलिसांनी एक सेमसंग कंपनीचा मोबाईल किमत 40 हजार असे एकूण 1 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
फिर्यादी सुदर्शन देवराव वानोळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी उमेश किशोरचंद राय रा. वेकोली क्वार्टर प्रगती नगर (कोलार पिंपरी ) ह. मु. महादव नगरी चिखलगाव विरुद्द भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3,7,25,27 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.