वणी टाईम्स न्युज : तिकिटाचे पैसे मागितले म्हणून महिला प्रवाशाने एस टी. महिला कंडक्टरला शिवीगाळ करत थापड-बुक्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवार 20 मे रोजी सायंकाळी चंद्रपूर ते वणी बसमध्ये घडली. घटनेबाबत वणी आगारातील महिला वाहक वर्षा प्रभाकर सिडाम (35) रा. सदाशिव नगर, चिखलगाव हिने वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून महिला प्रवासी काजल गोविंद डवरे (रा. राजूर कॉलरी, ता. वणी) हिच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदार वर्षा सिडाम या वणी आगारात गेल्या दोन वर्षांपासून एस.टी. महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी 3.30 वाजता त्यांनी चालक सचिन ठाकरे सोबत चंद्रपूर येथून बस क्र. MH-40 AQ 6092 ने वणी साठी निघाल्या होत्या. त्यावेळी एका महिला प्रवाशाला चंद्रपूर ते वणी तिकीट ऐवजी चुकून चंद्रपूर ते वरोरा पर्यंत तिकीट दिले. वरोरा स्टॉपवर महिला वाहक हिने महिला प्रवाशाला वरोरा ते वणी पर्यंत तिकीट देऊन 42 रुपयांची मागणी केली. त्यामुळे ती प्रवासी संतप्त झाली.
महिला वाहक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित प्रवाशाने त्यांना “प्रवाशांची लूट करता” असे आरोप करत शिवीगाळ केली आणि बसमध्ये तसेच वणी बसस्थानकावर थापड व बुक्यांनी मारहाण केली. यानंतर ती महिला प्रवासी कोणत्याही प्रकारचा संपर्क न करता बसमधून उतरून गेली. पुढे प्रवाशांकडून त्या महिलेचे नाव काजल डवरे असल्याचे समोर आले.
मारहाणीनंतर पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या वाहक महिलेला वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठवण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पोलिसांत दिलेल्या जबानी रिपोर्टवरून सदर महिला प्रवाशाविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी व मारहाणीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणी पोलीस अधिक तपास करत असून, सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यावर झालेल्या या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.