वणी टाईम्स न्युज : येथील एका शिक्षकाला कमी किमतीत शेअर मिळवून देण्याचा आमिष दाखवून अज्ञात भामट्याने 13 लाख 67 हजाराचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित शिक्षक किशोर ओंकार चौधरी (44) रा. गुलमोहर पार्क वणी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी Barclays Securities कंपनीचे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार फिर्यादी हे गुलमोहर पार्क वणी येथे वास्तव्यास असून जि.प. शाळा क्रमांक 5 येथे शिक्षक म्हणून रुजू आहे. 18 फेब्रुवारी रोजी फिर्यादी हे व्हॉट्सॲप बघत असताना Barclays Securities कंपनीचे प्रतिनिधी टीना मित्तल, अनिल कुमार गोयल व कस्टमर केअर प्रतिनिधी यांनी त्यांच्याशी संपर्क केला. आरोपी यांनी 50 टक्का डिस्काउंट वर आयपीओ सबस्क्राईब करण्याचे आमिष दाखवून मोबाईल वर Barclays (BG-SCII) अँप डाउनलोड करायला भाग पाडले.
त्यानंतर आरोपी यांनी 18 फेब्रुवारी 2024 ते 6 मार्च 2024 या कालावधीत फिर्यादी कडून वेगवेगळ्या खात्यात 13 लाख 67 हजार रुपये घेतले. मात्र त्यानंतर आरोपी यांनी किशोर चौधरी याचा फोन उचलणे बंद केला. यावरून फिर्यादी याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी Barclays Securities कंपनीचे प्रतिनिधी टीना मित्तल, अनिल कुमार गोयल व कस्टमर केअर प्रतिनिधी विरुद्ध कलम 318 (4) BNS व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.