वणी टाईम्स न्युज : शहरात बँक, दवाखाना, टॉकीज, मंगल कार्यालय किंवा बाजारात दुकानांसमोर उभी केलेली मोटरसायकल एका क्षणात कधी चोरी होईल, याचा काही नेम राहिला नाही. टॉकीज मध्ये पिक्चर पहायला गेलेल्या एका युवकाची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार सोमवार 3 मार्च रोजी वणी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली.
फिर्यादी पुरुषोत्तम रामचंद्र तेलतुंबडे (63) रा. वांजरी, ता. वणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा हा दिनांक 22 फेब्रुवारी रोजी शहरातील दीप्ती टॉकीजमध्ये दुपारी 4 वाजता ‘छावा’ पिक्चर पहायला गेला होता. टॉकीजमध्ये जाताना त्यांनी आपली हिरो होंडा पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक MH29 AU 2542 दीप्ती टॉकीज समोर उभी केली होती.
पिक्चर पाहून परत टॉकीज बाहेर आला असता ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी दिसून पडली नाही. इकडे तिकडे शोध घेऊन ही दुचाकीचा सुगावा लागला नाही. शेवटी फिर्यादी यांनी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने त्यांची काळया रंगाची जुनी वापरती हिरो होंडा पॅशन प्रो मोटरसायकल किंमत अंदाजे 30 हजार चोरून नेल्याची तक्रार नोंदविली.