वणी टाईम्स न्युज : शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी बाल कामगारांच्या माध्यमातून कामकाज केले जात आहे. आस्थापनांमध्ये बाल कामगार ठेवण्याची माहितीवरुन बाल कामगार विरोधी कृती दलाने शुक्रवार 10 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजता साधनकरवाडी परिसरात एका दुकानात धाड टाकून एका बाल कामगाराची सुटका केली.
उद्योग, उर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णयानुसार व जिल्हा अधिकारी, यवतमाळ यांच्या निर्देशानुसार गठित बाल कामगार कृती दलाकडून बाल कामगार धाड सत्र राबविण्यात येत आहे. कृती दलाला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून कृतीदल सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ प्रवीण दत्तात्रय गेडाम, महात्मा ज्योतीबा फुले स. कार्य. महा. यवतमाळचे प्रतिनिधी दिपक रा. आटे, जिल्हा समादेशक होमगार्ड यवतमाळचे प्रतिनिधी निरंजन एम. मलकापुरे, रामेश्वर तिळेवाड, पोलीस स्टेशन वणी व दुकान निरीक्षक वणी विजय पा. गुल्हाने यांनी साधनकरवाडी परिसरात एका आस्थापनावर धाड टाकली.
पथकाला आस्थापना मालकाने बाल कामगारांना त्याच्या आस्थापनेमध्ये कामाला लावलेले असुन तिथे बाल कामगार काम करीत असल्याचे आढळून आले. सदर व्यवसाय हा धोकादायक उद्योगात येत असल्याने व या उद्योगात बालकांना कामावर लावल्यास प्रतिबंध असल्याने आस्थापना मालक बालकाचे आर्थीक, मानसिक व शारीरिक शोषण करीत असल्याचे दिसुन आले. आस्थापना मालकाचे हे कृत्य बाल न्याय, बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 याला भंग करण्याचे असून फिर्यादी दुकान निरीक्षक श्रेणी 2 विजय पांडुरंग गुल्हाने यांनी दिलेल्या फिर्याद वरून वणी पोलीस स्टेशन मध्ये आरोपी वजीर खान मोहम्मद जफिर, रा. साधनकरवाडी विरुध्द अल्पवयीन न्याय व बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 75, 79 तसेच कलम 146 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करून बाल कल्याण अधिकारी यवतमाळ यांचे सुपूर्द करण्यात आले.