वणी टाईम्स न्युज : वेकोलिच्या कोळसा खाणीतून लाखो रुपयांचा भंगार चोरी केल्याची घटना बुधवार सकाळी उघडकीस आली आहे. उकणी जूनाड वेस्टर्न कोल्फिल्ड लिमी. चे उप क्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश विनायक फुलारे यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी वेकोलीचे एका अधिकाऱ्यांसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. लाखो रुपयांचा भंगार चोरी प्रकरणात वेकोलि अधिकाऱ्यांच्या सहभाग असल्याचे उघड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वा. सुमारास WCL उकणी विद्युत आणी यांत्रीकी विभाग उकणी येथील अंदाजे 9.5 टन वजनाचे जुने भंगार अंदाजे 30 हजार रुपये प्रती टन असा एकूण किंमत 2 लाख 85 हजाराचा भंगार लोखंडी माल आयशर वाहन क्र MH40 CM 6928 मध्ये या कोणीतरी चोराने चोरुन नेल्याचे लक्षात आले . डब्लु सि.एल.चे गार्ड व एम.एस.एफ चे गार्ड ने सदर आयशर वाहनाचा परीसरात शोध सुरु केला असता वाहन भालर येथे मिळाले.
सुरक्षा रक्षकांनी वाहन चालक अतुल गजानन पिदुरकर रा. कोलार पिंपरी ता.वणी जि. यवतमाळ यांना विचारणा केली असता त्यांने सांगीतले की, उकणी खाणीतील यांत्रीकी विभागाचे उप प्रबंधक अनुप कुमार साही यांचे सांगण्यावरून लोडरच्या सहाय्याने भंगार ट्रकमध्ये लोड करुन वणी येथील दिपक चौपाटी येथील सत्तार भाई दुकानाचे बोर्ड असलेल्या दुकानाच्या समोरील रोडचे बाजुला त्यांनी उतरविला आहे.
वाहन चालकाने दिलेल्या माहितीवरून डब्लु सि.एल.चे गार्ड व एम.एस.एफ चे गार्ड यांनी वणी येथे दीपक चौपाटी परिसरातून मुद्देमाल व वाहन ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन शिरपुर येथे जमा केले. फिर्यादी उप क्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश विनायक फुलारे यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी आरोपी उप प्रबंधक यांत्रीकी विभाग उकणी अनुप कुमार साही व वाहन चालक अतुल गजानन पिदुरकर रा. कोलार पिंपरी ता.वणी जि.यवतमाळ यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.
वेकोलितून भंगार चोरीच्या धंद्यात अनेकांचे हात ओले
वणी तालुक्यात वेस्टर्न कोलफील्डच्या कोळसा खाणीतून भंगार चोरीचा एक मोठा नेटवर्क असून त्यामध्ये वेकोलि अधिकाऱ्यापासून तर भंगार खरेदीदार, राजकीय नेते व कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे बोलले जाते. आज उघडकीस आलेल्या या प्रकरणामध्येही अनेक जण मॅनेज झाल्याची खमंग चर्चा आहे.