वणी टाईम्स न्युज : महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान होऊ नये म्हणून शहरातील काही विशिष्ठ बुथवर मतदारांना मतदानापासून रोखण्याचा प्रकार होण्याची माहिती मिळाल्याचा गौप्यस्फोट शिवसेना यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. आघाडी उमेदवार संजय देरकर यांचे निवासस्थानी पत्रकारांना माहिती देताना गायकवाड यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीत यवतमाळमध्ये एका राजकीय पक्षाकडून मतदारांच्या बोटावर शाई लावून त्यांना मतदान न करु देता पैसे देऊन परत घरी पाठविण्याचा प्रकार त्यांनी उघडकीस आणला होता.
उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही वणीत काही ठराविक बूथवर मतदारांना पैसे वाटप करुन त्यांच्या बोटावर शाई लावून मतदानापासून वंचित करण्याचा कट रचला जात असून भरारी पथकाने अश्या प्रकारावर बारीक नजर ठेवण्याची गरज असल्याचे राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले. तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा प्रत्येक बूथवर नजर ठेवणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
राजेंद्र गायकवाड यांनी केलेले खळबळजनक खुलासा बाबत सहा. निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार निखिल धुळधर यांची प्रतिक्रिया जाणण्यासाठी फोन केला असता, मतदान पथक रवनगीच्या कामात व्यस्त असल्याने पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी काय म्हटलं याचा व्हिडिओ बघून सांगता येईल. असे त्यांनी वणी टाईम्सला सांगितले.