जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा मतदार संघ काबीज करण्यासाठी महाविकास आघाडी उमेदवाराला कसरत करावी लागणार की, सहजपणे ही लढाई जिंकणार ? याची उत्सुकता सर्वांना आहे. महाविकास आघाडीचे संजय देरकर समोर विद्यमान आमदार भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजु उंबरकर सोबतच काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय खाडे यांनीही आवाहन उभे केले आहे. खाडे यांची उमेदवारीमुळे वणी विधानसभेची लढत रंगतदार होणार आहे.
वणी हा कुणबी समाज बहुल मतदार संघ आहे. शिवसेनेचे संजय देरकर आणि अपक्ष उमेदवार संजय खाडे हे दोन्ही कुणबी समाजाचे आहे. संजय खाडे यांचा मतदार संघात चांगला प्रभुत्व आहे. मागील दोन वर्षापासून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. तर महाविकास आघाडीचे संजय देरकर यांची ओळख फक्त निवडणुकीच्या वेळी जनसंपर्कात असलेले नेते असल्याचे बोलले जाते.
संजय खाडे यांच्या उमेदवारीमुळे वणी मतदार संघात काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) पक्ष दोनफाड झाले आहे. आघाडी धर्म पाळायचे म्हणून काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार व शिवसेनेचे काही कार्यकर्ते संजय देरकर सोबत आहे. तर काँग्रेस पक्षाची पारंपरिक सीट गमावल्याने नाराज असलेला काँग्रेसचा एक मोठा गट संजय खाडे यांच्या प्रचाराला भिडून आहे. शिवसेनेचे माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व त्यांचे कार्यकर्तेही अपक्ष उमेदवार संजय खाडे सोबत आहे.
काँग्रेस पक्षाचे संजय खाडे यांनी वणी विधानसभा उमेदवारीसाठी दावा दाखल केला होता. तिकीट मिळविण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकरसह अखेर पर्यंत त्यांनी प्रयत्न केले. मात्र वणीची जागा शिवसेनेच्या वाटेला गेल्यामुळे संजय खाडेची उमेदवारी कापून दोन वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या संजय देरकर यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नेतेमंडळीसह सर्वसाधारण कार्यकर्ता दुखावले गेले. दुसरीकडे वणी विधानसभा मतदार संघात शिवसेनेची धुरा सांभाळणारे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर अनुयायी माजी आमदार विश्वास नांदेकर यांनाही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वासात घेतले नाही. त्यामुळे नांदेकर गटाने बंड पुकारले.
वणी हा कुणबी समाज बहुल मतदार संघ आहे. असे असताना अल्पसंख्यक समाजाचे वामनराव कासावार यांनी 4 टर्म तर मागील 2 टर्म पासून संजीवरेड्डी बोदकुरवार आमदार म्हणून निवडून आले. कुणबी समाजाचे संजय देरकर यांनी 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 2 वेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढली. मात्र प्रत्येक वेळी मतदारांनी त्यांचे नेतृत्व नाकारले. या निवडणुकीत देरकर शिवसेना कडून मैदानात आहे. तर संजय खाडे हा नवीन चेहरा म्हणून शर्यतीत आहे.