जितेंद्र कोठारी, वणी : येत्या 20 नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना ईवीएम मशिनीवर पंजा, धनुष्यबाण व घड्याळ चिन्हे दिसणार नाहीत. वणी विधानसभा मतदार संघात पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचा पंजा चिन्ह ईवीएम मशिनिवरून हद्दपार झाला आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणूक चिन्ह घड्याळ व शिवसेनेचा धनुष्यबाणही ईवीएम वरुन गायब राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वयोवृध्द व निरक्षर मतदार जे फक्त निवडणूक चिन्ह पाहून मतदान करतात त्यांचे मत भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वणी विधानसभा मतदार संघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे संजय देरकर उमेदवार आहे. त्यांचा निवडणूक चिन्ह मशाल आहे. महाविकास आघाडीत वणीची जागा शिवसेनेच्या वाटेला गेल्यामुळे येथे काँग्रेसचा उमेदवार उभा नाही. त्यामुळे साहजिकच काँग्रेसचा उमेदवार आणि पंजा दोन्ही निवडणुकीतून हद्दपार झाले आहे. आज पर्यंतच्या निवडणुकीत पहिल्यांदा असं होणार की राष्ट्रीय पक्षाचा चिन्ह मतदारांना व्होटिंग मशीनवर बघायला मिळणार नाही.
महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना तिकीट मिळाली. त्यांचे निवडणूक चिन्ह कमळ फूल आहे. त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष शिवसेना (एकनाथ शिंदे) यांचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचा निवडणूक चिन्ह घड्याळ मतदारांना बॅलेट मशीन वर दिसणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्ह शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाला देण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्ह अजित पवार गटाच्या ताब्यात आहे.