वणी टाईम्स न्युज : अवैध मटका व्यावसायिकाशी संबंध असल्याच्या आरोपावरून वणी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी दोघांना निलंबन आदेश दिले. पंकज उंबरकर आणि विशाल गेडाम असे या मटका बहाद्दर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
उल्लेखनीय आहे की, वणी टाईम्स न्युजने 6 ऑक्टोबर रोजी खाकीवर डाग : ‘त्या’ दोन मटका बहाद्दर पोलीस कर्मचाऱ्यांची व्हॉट्सॲप चॅटिंग व्हायरल या मथळ्याखाली सर्वात पहिले बातमी प्रकाशित करुन या मटका बहाद्दर पोलिसांचे कारनामे उजागर केले होते. वणी येथील मटका व्यावसायिक अल्ताफ शेख यांनी पोलीस ठाण्यातील कर्मचारी पंकज उंबरकर आणि विशाल गेडाम यांच्यावर मटका पट्टी उताराचे लाखों रुपये बाकी असल्याचे आरोप करीत व्हॉट्सॲप चॅटिंग व्हायरल केली होती. विशेष म्हणजे निलंबित झालेले दोघांपैकी पोलीस कर्मचारी पंकज उंबरकर यांना यापूर्वीही निलंबित करण्यात आले होते.