वणी टाईम्स न्युज : येत्या गणेशोत्सव तसेच ईद ए मिलाद मिरवणुकीत लेझर लाईट शो वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लेझर किरणांचा वापर आरोग्यासाठी घातक तसेच सामाजिक सुरक्षिततेला धोका असल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ यांनी दिनांक 14 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2024 या कालावधीत लेझर लाईट वापरास प्रतिबंध आदेश जारी केले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहील, असा इशारा अधिसूचनेत देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव परिसरात गणेशमूर्ती आगमनाच्या वेळी काढण्यात आलेली मिरवणूक दरम्यान लेझर लाईट एका भाविकाच्या डोळ्यावर पडल्यामुळे डोळा निकामी झाल्याची घटना घडली होती. तसेच 2023 मध्ये जिल्ह्यातील उमरखेड येथे एका धार्मिक मिरवणुकीत दुसऱ्या समाजातील मूर्तीवर लेझर लाईटच्या सहाय्याने धार्मिक स्थळाची प्रतिकृती दर्शविण्यात आल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाला होता.
आरोग्य आणि सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी भारतीय नागरिक सुरक्षा सहिंता 2023 चे कलम 163(1) प्रमाणे आपल्या अधिकाराचा वापर करून वरील अधिसूचना काढली आहे.