वणी टाईम्स न्युज : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता यावं, या उद्देशाने निर्मित महात्मा फुले अभ्यासिकेचे सोमवार 12 ऑगस्ट रोजी खा. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. स्व. रामचंद्र पाटील खाडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ संजय खाडे फाऊंडेशन तर्फे शहरातील जटाशंकर चौक येथे प्रशस्त महात्मा फुले अभ्यासिकेची स्थापना करण्यात आली आहे.
अभ्यासिकेचे उद्घाटन खा. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे तर डॉ. भालचंद्र चोपणे हे या सोहळ्याचे अध्यक्ष राहणार आहेत. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार सुधाकर आडबाले व माजी आमदार वामनराव कासावार उपस्थित राहणार आहे. नरेंद्र पा.ठाकरे, ऍड. देविदास काळे, प्रा. दिलीप मालेकर, विजय मुकेवार, अरुणा खंडाळकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत.
सोमवार 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता मान्यवरांच्या उपस्थित या अभ्यासिकेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर शेतकरी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात करिअर कॉउंसलर विजय मुसळे यांचे “देश विदेशात शिक्षणाची संधी” या विषयावर व्याख्यान होणार आहे. अभ्यासीकेचा तसेच व्याख्यानाचा परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संजय खाडे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यात होणार मदत
स्पर्धा परीक्षेच्या या युगात अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण नसते. आवश्यक सोयी सुविधांचा अभावामुळे हुशार विद्यार्थीही स्पर्धामध्ये टिकत नाही. वणी तालुक्यातील विद्यार्थी अभ्यासात मागे राहू नये या उद्दात हेतूने ही अभ्यासिका स्थापन करण्यात आली आहे. महात्मा फुले अभ्यासिकेत एका सोबत 117 विद्यार्थ्यासाठी उत्तम बैठक व्यवस्था, फॅन, लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घेऊन आपले करिअर घडवावं.
संजय खाडे – जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस