वणी : ओव्हरटेक करुन पुढे जाण्याच्या नादात भरधाव दुचाकी प्रवासी ऑटोरिक्षावर जाऊन आदळली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे ऑटो चालकाचा ताबा सुटला व ऑटो रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात ऑटोरिक्षा मधील एक महिला प्रवासी जागीच ठार झाली. तर मोटरसायकल चालकासह तिघ जण गंभीर जखमी झाले. गंगा संजय किनाके (35) रा. राजूर कॉलरी असे या अपघातात दगावलेल्या महिलेचे नाव आहे. सदर घटना वणी यवतमाळ मार्गावर राजूर रिंग रोड जवळ सोमवारी सायंकाळी 6 वाजता दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार लालपुलिया येथून कोळसा मजुरांना घेऊन प्रवासी ऑटो राजूर येथे जात होता. राजूर रिंगरोड जवळ मागून येणाऱ्या एका दुचाकीने ऑटोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला असता अचानक समोरून एक ट्रक आला. ट्रकची टक्कर वाचविण्यासाठी दुचाकी बाजूला जात असलेल्या ऑटोवर जाऊन धडकली. दुचाकीने धडक दिल्यामुळे ऑटोचालकाचा ऑटोवरून ताबा सुटला व भरधाव ऑटो रस्त्याच्या बाजूला पलटी झाला.
या अपघातात प्रवासी महिला मजूर गंगा किनाके ही ऑटोखाली दबल्यामुळे जागीच ठार झाली. तर दुचाकीचालक दिनेश कवडू येटे (47) रा. पळसोनी, ऑटो मधील प्रवासी अरुण कुळसंगे व उज्ज्वला बंडू पाटील रा. राजूर हे गंभीर जखमी झाले. तर चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. गंभीररीत्या जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.