जितेंद्र कोठारी, वणी : येथील दिवाणी व फौजदारी (क.स्तर) न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या प्रकल्पाला शासनाकडून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. न्यायालयाच्या 5 मजली (तळमजल्यासह) नवीन इमारतीसाठी शासनाने 67.35 कोटी रुपयांच्या निधीला नुकतेच प्रशासकीय मान्यता दिली आहे. वणी यवतमाळ मार्गावर परसोडा येथे उभारण्यात येणाऱ्या न्यायालयाच्या नवीन व प्रशस्त इमारतीचे बांधकाम लवकरच प्रारंभ केल्या जाणार आहे. न्यायालयाच्या नवीन इमारतीला मंजुरी मिळाल्यामुळे वणी वकिल संघाचे स्वप्न साकार होणार आहे.
वणी येथील न्यायालयाची इमारत जीर्ण अवस्थेत झाली आहे. त्यामुळे न्यायालयीन कर्मचारी, वकील, नागरिक आणि न्यायाधीश यांना मोठा त्रास सहन करावा लागतं. पावसाळ्यात तर इमारतींमध्ये गळणाऱ्या पाण्यामुळे संपूर्ण न्यायालय वेठीस धरले जाते. न्यायालयाच्या इमारतींचे हे चित्र वणी मध्ये अधिकच भीषण असल्यामुळे इमारत बांधणी करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारधीन होता. तसेच वणी उपविभागाची लोकसंख्या व व्याप्ती लक्षात घेऊन वणी येथे वरिष्ठ व सत्र न्यायालय सुरु करण्याची वकील संघाची मागणी होती. तसेच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी येथे नवीन व विस्तारित न्यायालय सुरु करण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता.
नविन इमारतीमध्ये दिवाणी व फौजदारीसह सत्र न्यायालय
वणी येथे फौजदारी व दिवाणी न्यायालयात 3 कोर्टरूम आहे. सेशन न्यायालयात वर्ग प्रकरणासाठी नागरिकांना पांढरकवडा येथे जावं लागतात. शासनाने मंजूर केलेल्या नवीन इमारतीमध्ये फौजदारी व दिवाणी न्यायालयसह सिनीयर डिविजन व सत्र न्यायालय सुरु होणार आहे. त्यामुळे नागरिकांना व वकिलांना होणार त्रास वाचणार आहे.
6 कोर्ट हॉल आणि अद्यावत यंत्रणा
वणी न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमध्ये एकूण 6 कोर्ट हॉल असणार आहेत. याठिकाणी अद्यावत यंत्रणा व अत्याधुनिक सुविधांचा मेल बघायला मिळणार आहे. अंतर्गत आणि बाह्य विद्युतीकरण, सुसज्ज फर्निचर, पाणी पुरवठा व मलनि:सारण, अग्निशमन यंत्रणा, सुसज्ज वाहनतळ, वातानुकुलीत यंत्रणा, लिफ्ट, सीसीटीव्ही, पॉवर बॅकअप, वकिलांसाठी प्रशस्त बाररूम, अपंगासाठी रैंप आदीची तरतूद करण्यात आली आहे. न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य याची मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही. याची दक्षता या नवीन इमारतीच्या बांधकाम दरम्यान घेतली जाणार आहे.