सुशील ओझा, झरी : आदिवासी बहुल झरीजामणी तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या आत्महत्येच्या घटनेमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. शुक्रवार 22 डिसेंबर रोजी खातेरा येथील एका इसमाने राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. तालुक्यात मागील एका आठवड्यात आत्महत्येची ही चौथी घटना आहे. सुनील दादाजी टेकाम (36) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक हा मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. शुक्रवार सकाळी 10 वाजता दरम्यान त्यांनी आपल्या घरातच विषारी कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबीयांना याबाबत माहिती होताच त्यांनी सुनील याला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र 12.30 वाजता दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मागील एका आठवड्यात झरी तालुक्यातील सिंदीवाढोना, डोंगरगाव, आमलोन आणि खातेरा येथील चौघांनी गळफास घेऊन तसेच विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले. दिवसाआड होणाऱ्या आत्महत्येच्या घटनांमुळे तालुका पुरता हादरला आहे. मृतक सुनील टेकामच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. त्यांनी आत्महत्या का केली ? याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. घटनेची पुढील तपास मुकुटबनचे ठाणेदार सुरेश म्हस्के यांचे मार्गदर्शनात जमादार प्रभाकर कांबळे करीत आहे.