वणी टाईम्स विशेष –
वणी परिसरात कोळसा खाणी, औद्योगिक प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणावरील वाहतूक व्यवसायामुळे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि मजूर वर्गाची सतत वर्दळ असते. या वाढत्या ग्राहकवर्गामुळे शहरासह आजूबाजूच्या भागात हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या व्यवसायांच्या अन्नसुरक्षा नियमांचे पालन आणि शासकीय परवान्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
वणी टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील अनेक हॉटेल व ढाब्यांकडे अन्न व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक असलेले FSSAI (Food Safety and Standards Authority of India) चे नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवानाच नाही. रस्त्यालगत प्लॉटवर, शेतात अथवा घरात अनधिकृतपणे शेकडो ढाबा, रेस्टॉरंट व हातगाड्यातून खाद्य पदार्थांची विक्री होत आहे. हा अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 च्या तरतुदींचे खुलेआम उल्लंघन आहे.
काय आहे अन्न सुरक्षा कायदा ?
अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कोणत्याही खाद्य व्यवसायाला नोंदणी अथवा परवाना घेणे बंधनकारक आहे. तसेच अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक, कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित व्यावसायिकावर असते.
ग्राहकांची तक्रारी व प्रशासनाचे कर्तव्य
स्थानिक नागरिक आणि ग्राहकांकडून अनेकदा खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रारी होत असल्याचे सांगितले जाते. मात्र संबंधित हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ढाब्यांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने नियमित नमुना तपासणी, स्वच्छता निरीक्षण किंवा परवाना पडताळणी मोहीम कितपत राबविली आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘अजिनोमोटो’चा वापर की गैरवापर ?
अनेक हॉटेल आणि ढाब्यांमध्ये खाद्यपदार्थ अधिक चविष्ट करण्यासाठी मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) अर्थात “अजिनोमोटो” सर्रास वापरले जात असल्याची माहिती समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, MSG हा मानवी आरोग्यासाठी घातक असून अती वापरामुळे रक्तदाब व किडनी संबंधित समस्या उद्भवू शकते.
ग्राहकांना अवैधरित्या मद्यविक्री !
वणी शहराच्या चहुदिशेने असलेल्या महामार्गांवर अनेक ढाबा व व्हेज नॉन व्हेज हॉटेल सुरू आहे. यातील काही ढाब्यांमध्ये ग्राहकांना अवैधरित्या देशी विदेशी दारु उपलब्ध करून दिली जात असल्याचेही आरोप होत आहे. त्यामुळे या आरोपांची चौकशी संबंधित पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.जर कोणत्याही आस्थापनात आवश्यक परवान्याविना मद्यविक्री होत असेल, तर तो स्वतंत्र कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.
प्रशासनाने विशेष मोहीम राबविण्याची गरज
वणीसारख्या औद्योगिक आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या भागात हजारो नागरिक दररोज हॉटेल व ढाब्यांवर भोजन करतात. त्यामुळे सर्व हॉटेल, ढाबा आणि रेस्टॉरंटचे FSSAI परवाने तपासणे, खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणे, स्वच्छता व अन्नसुरक्षा मानकांची पडताळणी, कथित अवैध मद्यविक्रीच्या तक्रारींची चौकशी तसेच नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांचा प्रश्न ?
वणी परिसरात शेकडो ग्राहक दररोज हॉटेल आणि ढाब्यांवर अवलंबून असताना, अन्नसुरक्षा नियमांचे पालन प्रत्यक्षात होत आहे का? परवान्याविना व्यवसाय, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि कथित बेकायदेशीर व्यवहारांच्या चर्चांमध्ये तथ्य किती, याचे उत्तर आता अन्न व औषध प्रशासन, पोलिस आणि संबंधित विभागांच्या तपासणीतूनच समोर येऊ शकते.
(टीप : वरील बाबी स्थानिक पातळीवर प्राप्त माहितीनुसार आणि नागरिकांकडून व्यक्त होत असलेल्या चिंतेच्या आधारे मांडण्यात आल्या आहेत. संबंधित यंत्रणांनी अधिकृत चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.)










