वणी टाईम्स न्युज : वणी तालुक्यातील मोहूर्ली ग्रामपंचायतीतील विकासकामांच्या माहितीच्या मागणीवरून निर्माण झालेला वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याची सचिवाची तक्रारीवरून गावातील एका पुरुषासह दोन महिलांविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांवरील खर्च, मंजूर निधी, ग्रामसभेचे इतिवृत्त तसेच इतर प्रशासकीय कागदपत्रांची माहिती मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. यासंदर्भात झालेल्या मासिक सभा आणि ग्रामसभांमध्येही नागरिकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले होते. मात्र अपेक्षित माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या मते, माहितीची मागणी होताच सरपंच आणि ग्रामपंचायत सचिव यांनी सभा अर्धवट सोडल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यानंतर २ जून रोजी ग्रामस्थांनी स्वतंत्रपणे बैठक घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा ठराव मंजूर केला. या निर्णयानुसार ३ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले.
या प्रकारानंतर ग्रामपंचायत सचिव उल्हास नगराळे यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे कवडू वडसकर, योगिनी कोसारकर आणि पुष्पा काळे ह्या ग्रामस्थाविरुद्ध शासकीय कार्यालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतरही ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असून ग्रामपंचायतीच्या विकासकामांची सखोल चौकशी करून सर्व माहिती नागरिकांसमोर जाहीर करण्याची मागणी त्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुढे कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.











