वणी टाईम्स न्युज : मारेगाव तालुक्यातील हिवरा शेतशिवारात गुरुवारी दि. 28 मे रोजी सायंकाळी अचानक आभाळ दाटून आलेल्या वादळी वातावरणात वीज कोसळून बैलजोडी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत शेतकरी मंगल जनार्दन खिरटकर (रा. चोपण, ता. मारेगाव) यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास हिवरा येथील शेतशिवारात अचानक वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. त्यावेळी बैलजोडी झाडाखाली उभी असताना अचानक वीज कोसळली. या भीषण घटनेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला.
खरीप हंगामाच्या तोंडावरच बैलजोडी दगावल्याने शेतकरी मंगल खिरटकर यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतीच्या कामासाठी बैलजोडी महत्त्वाची असताना झालेल्या या नुकसानीमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने पंचनामा करून शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.










